शबनम न्यूज | प्रतिनिधी
आमदार अमित गोरखे यांच्या पाठपुराव्यानंतर पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना आता महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये पुन्हा एकदा आयुर्वेद आणि होमिओपॅथी उपचार मिळणार आहेत. महापालिका प्रशासनाने शहरातील तीन रुग्णालयांमध्ये या ओपीडी (OPD) तातडीने सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. यापूर्वी वायसीएम रुग्णालयातील आयुर्वेदिक ओपीडी बंद झाल्याने नागरिकांची गैरसोय होत होती. आमदार गोरखे यांनी विधानपरिषदेमध्ये लक्ष वेधले होते, आयुक्तांनी देखील या संदर्भात प्रामुख्याने लक्ष घातले होते. या मागणीनंतर झालेल्या मा. आयुक्तांच्या बैठकीत आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद देत तातडीने कार्यवाहीचे आदेश दिले आहेत. यामुळे नागरिकांना आता स्वस्त आणि सोप्या पद्धतीने उपचार मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्याचबरोबर निगडी-दापोडी अर्बन स्ट्रीट प्रकल्पातील निकृष्ट कामाची चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी केली. तसेच, शहराच्या प्रारूप विकास आराखड्यातील आरक्षण बदलांवर आक्षेप घेत आराखडा नव्याने तयार करण्याची मागणी केली.
याशिवाय, श्वान हल्ले आणि पशुवैद्यकीय विभागातील भ्रष्टाचारावर तातडीने उपाययोजना करणे, तसेच सांस्कृतिक कार्यक्रम अचानक रद्द होण्यावर आळा घालण्यासाठी धोरण ठरवणे यासारख्या मागण्याही त्यांनी केल्या. या सर्व विषयांवर आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित अधिकाऱ्यांना कार्यवाहीचे आदेश दिल्याचे आमदार गोरखे यांनी सांगितले. स्वच्छ सर्वेक्षण २०२४ मध्ये शहराला मिळालेल्या यशाबद्दल त्यांनी आयुक्त व महापालिका कर्मचाऱ्यांचे अभिनंदनही केले.