शबनम न्यूज | प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश केल्यानिमित्त मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी केंद्रीय पर्यटन, सांस्कृतीक मंत्री गजेंद्रसिह शेखावत यांची भेट घेऊन आभार मानले. या निर्णयामुळे महाराष्ट्राच्या ऐतिहासिक महत्त्वाला जागतिक मान्यता तर मिळेलच, शिवाय पर्यटन, स्थानिक रोजगार आणि सांस्कृतिक ओळखीलाही नवी दिशा मिळेल, असा विश्वासही खासदार बारणे यांनी व्यक्त केला.
खासदार बारणे यांनी केंद्रीय पर्यटन, सांस्कृतीक मंत्री गजेंद्रसिह शेखावत यांची दिल्लीत भेट घेतली. त्यांचा सत्कार करुन आभार मानले. खासदार बारणे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी हे ११ किल्ले आणि तमिळनाडूतील जिंजी या एका किल्ल्याचा समावेश आहे. हा निर्णय महाराष्ट्रासाठी आणि भारतासाठी खूप मोठा अभिमानाचा क्षण आहे. युनेस्कोच्या यादीत समावेश झाल्यामुळे या किल्ल्यांचे जागतिक स्तरावर जतन आणि संवर्धन केले जाईल.या निर्णयामुळे महाराष्ट्राच्या ऐतिहासिक महत्त्वाला जागतिक मान्यता मिळेल.
सांस्कृतिक ओळखीलाही नवी दिशा मिळेल. याबाबतचा निर्णय जागतिक वारसा समितीच्या ४७ व्या अधिवेशनात घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सांस्कृतीक मंत्री गजेंद्रसिह शेखावत यांच्या नेतृत्वाखालील सांस्कृतिक मंत्रालय आणि महाराष्ट्र सरकारने या ऐतिहासिक निर्णयाचे केलेले कौतुक सर्व देशवासीयांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. या निर्णयामुळे देशाच्या सांस्कृतिक वारशाला मिळणारे नवे वैभव कौतुकास्पद आहे. भविष्यातही महाराष्ट्राच्या ऐतिहासिक वारशाच्या जतन आणि संवर्धनासाठी केंद्र सकारात्मक प्रयत्न करित राहिल.