शबनम न्यूज | प्रतिनिधी
पुणे, पिंपरी-चिंचवडमधून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ ची दुरवस्था झाली आहे. स्त्यांवरील खड्डे व अरुंद लेनमुळे वाहतूक कोंडी व अपघात वाढले आहेत. त्यामुळे या महामार्गाची सुधारणा करावी. रस्त्याची रुंदी वाढवावी, नव्याने डांबरीकरण करावे, उड्डाणपूल बनविण्यात यावेत. वाढती वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे साकडे मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना घातले.
खासदार बारणे यांनी दिल्लीत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. या महामार्गाची परिस्थिती त्यांच्या निदर्शनास आणून दिली. खासदार बारणे म्हणाले, पुणे शहरातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८ हा एक महत्त्वाचा मार्ग आहे. कार्ला फाटा, वडगाव फाटा, तळेगाव फाटा आणि देहूरोड फाटा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होते. उड्डाणपूलांची कमतरता आणि रुंदीकरणाचा अभाव यामुळे या मार्गावर वाहतुकीची स्थिती अधिकच बिकट झाली असून, नागरिकांच्या दैनंदिन प्रवासावर त्याचा प्रतिकूल परिणाम होत आहे. या महामार्गाच्या उन्नयनामुळे पुणे शहरातून होणारी वाहतूक अधिक सुरळीत होईल आणि प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल.
पिंपरी-चिंचवड शहराच्या हद्दीतील राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८ च्या लगतच्या सेवा रस्त्यांचा विस्तार झाल्यास, वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल. हा मार्ग सद्यस्थितीत खराब अवस्थेत असून दुरुस्ती व रुंदीकरणाची तातडीची गरज आहे. रस्त्यांवरील खड्डे व अरुंद लेनमुळे वाहतूक कोंडी व अपघात वाढले आहेत. अनेक ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८ अरुंद असल्याने वाहतूक कोंडी होते. त्यामुळे रस्त्याची रुंदी वाढवावी. जुन्या आणि खराब झालेल्या रस्त्यांवर नवीन डांबरीकरण करून, रस्त्याची गुणवत्ता सुधारावी. यामुळे प्रवासाचा वेग वाढेल आणि सुरक्षितता देखील वाढेल. या उपाययोजना त्वरित केल्यास प्रवास सुरक्षित, जलद व सुलभ होईल.
पुणे हे महाराष्ट्राच्या मध्यवर्ती ठिकाणी असून कोल्हापूर, सोलापूर, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर व नाशिक यांसारख्या शहरांशी जोडणारे राष्ट्रीय महामार्ग आहेत. वाढत्या वाहतुकीच्या पार्श्वभूमीवर या मार्गांचे तातडीने रुंदीकरण आवश्यक आहे. यामुळे प्रवास सुलभ होईल, व्यापाराला गती मिळेल आणि अपघातांचे प्रमाण कमी होईल. या मार्गांचे विस्तारीकरण, उड्डाणपुलांची निर्मिती व पायाभूत सुधारणा केल्यास पश्चिम भारताचा वेगवान व शाश्वत विकास अधिक सुलभ होईल. या कामांसाठी तातडीने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी खासदार बारणे यांनी केली.