४ ते ६ ऑगस्टदरम्यान प्रक्रिया; ६ ऑगस्टला गुणवत्ता यादी
शबनम न्यूज | प्रतिनिधी
केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत इयत्ता अकरावी प्रवेशासाठी चार नियमित प्रवेश फेऱ्यांची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यानंतर आता सर्वांसाठी खुली प्रवेश फेरी (ओपन टू ऑल) घेण्यात येणार आहे. या फेरीचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे. या फेरीची ४ ते ६ ऑगस्ट या कालावधीत प्रक्रिया राबविण्यात येणार असून, ६ ऑगस्टला गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे.
राज्यात एकूण चौथ्या फेरीअखेर ९ हजार ५२२ कनिष्ठ महाविद्यालयांची नोंदणी झाली असून, यात एकूण प्रवेश क्षमता २१ लाख ५० हजार ४७९ दर्शविण्यात आली.
चौथ्या फेरीअखेरपर्यंत १४ लाख ३८ हजार ४८९ व्द्यिार्थ्यांनी संकेतस्थळावर नोंदणी केली. एकूण चार फेऱ्या पूर्ण झाल्या असून, एकूण ८ लाख ८२ हजार ८१ व्द्यिार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले. अद्यापही प्रवेशासाठी १२ लाख ६८ हजार ३९८ रिक्त जागा आहेत.
ओपन टू ऑल या फेरीमध्ये अर्ज करण्यास ४ ऑगस्टला सकाळी ८ वाजल्यापासून ते ५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६.३० पर्यंत मुदत आहे. आतापर्यंत झालेल्या चार फेऱ्यांमध्ये प्रवेश
न मिळालेले विद्यार्थी या प्रवेश फेरीमध्ये त्यांच्या अर्जाचा भाग एक व भाग दोन यामध्ये आवश्यकतेनुसार बदल व दुरुस्ती करू शकणार आहेत. नव्याने नोंदणीची सुविधाही उपलब्ध असणार आहे. जुलै २०२५ च्या इयत्ता दहावीच्या पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण झालेले व्द्यिार्थी या प्रवेश फेरीमध्ये त्यांची नोंदणी करून प्राधान्यक्रम नोंदवू शकणार आहेत.
ओपन टू ऑल या फेरीची गुणवत्ता यादी व विद्यार्थ्यांच्या प्राधान्यक्रमानुसार कॉलेज अलॉटमेंटची यादी ६ऑगस्टला सकाळी दहा वाजता प्रसिद्ध करण्यात येणार आहे, अशी माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी दिली आहे.