शबनम न्यूज | प्रतिनिधी
महाराष्ट्रातील लघुउद्योगांना भेडसावणाऱ्या समस्यांबाबत सविस्तर चर्चा करण्यासाठी फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन, महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष अभय भोर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पुणे यशदा येथे भेट घेतली. या भेटीत औद्योगिक वसाहतीतील मूलभूत सुविधा, वीजपुरवठा समस्या, वाहतूक कोंडी, ईएसआय रुग्णालयातील सुविधा, कामगारांसाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, एमआयडीसी मधील स्वच्छता व कचरा व्यवस्थापन, व इतर अनेक अडचणींबाबत सविस्तर मांडणी करण्यात आली.
अभय भोर यांनी उपमुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधून देत सांगितले की, लघुउद्योग हे राज्याच्या आर्थिक विकासाचा कणा असून, त्यांच्या अडचणी दूर करणे ही सरकारची प्राथमिक जबाबदारी आहे. त्यांनी उद्योजकांना दिलासा मिळावा यासाठी त्वरित निर्णय घेण्याची मागणी केली.
या भेटीला सकारात्मक प्रतिसाद देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी संबंधित विभागांना आवश्यक त्या कार्यवाहीचे आदेश देण्याचे आश्वासन दिले. लवकरच एक विशेष बैठक बोलावून लघुउद्योग क्षेत्रासाठी ठोस उपाययोजना राबवण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.