spot_img
spot_img
spot_img

‘हिरवे शहर, शुद्ध हवा’ या दिशेने पिंपरी चिंचवड महापालिकेचे महत्त्वपूर्ण पाऊल

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील प्रमुख रस्त्यांच्या दुतर्फा दर दहा मीटर अंतरावर देशी वृक्ष लागवड करण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम सध्या राबवण्यात येत आहे. महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या संकल्पनेतून व अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, मुख्य उद्यान अधीक्षक महेश गारगोटे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम प्रभावीपणे राबवला जात आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या उद्यान व वृक्ष संवर्धन विभागाच्या वतीने पर्यावरण संवर्धन आणि हरित शहर निर्माण करण्याच्या उद्देशाने वृक्षारोपण मोहीम उपक्रम हाती घेतला आहे. या वृक्षारोपण अभियानांतर्गत आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये शहरात दीड लाख देशी झाडांची लागवड करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या उपक्रमाची सुरुवात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘संतपीठ’ येथे ‘अजाण’ या देशी वृक्षाचे रोपण करून करण्यात आली होती. आता या उपक्रमांतर्गत शहरातील सर्व मुख्य रस्त्यांवर विशेषतः पदपथ शेजारील जागांमध्ये दर दहा मीटर अंतरावर झाडे लावण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

आतापर्यंत १९ हजार पेक्षा वृक्षांचे रोपण

महापालिकेच्या हद्दीतील ज्या रस्त्यांवर हरित आच्छादनाचे प्रमाण कमी आहे, अशा रस्त्यांना वृक्षारोपण करताना प्राधान्य देण्यात येत आहे. यामध्ये देशी वृक्ष प्रजाती जसे की ताम्हण, कदंब, कडुनिंब, बकुळ, पिंपळ, वड यांची लागवड केली जात आहे, जे पर्यावरणदृष्ट्या फायदेशीर असून स्थानिक हवामानाशी सुसंगत वृक्षांची लागवड करण्यात येत आहे. या मोहिमेत स्थानिक नागरिक, सामाजिक संस्था, लोकप्रतिनिधी, सीसीआर माध्यमातून अनेक नामवंत संस्था आणि स्वयंसेवी संस्था सहभाग होत आहेत. आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये ३१ जुलै २०२५ पर्यंत १९ हजार ५०० वृक्षांचे रोपण झाले आहे. लागवड केलेल्या वृक्षांचे संरक्षण सुनिश्चित करण्यासाठी त्यांना बांबू ट्री गार्ड तसेच आवश्यकतेनुसार लोखंडी ट्री गार्ड बसवण्यात आले आहेत.

रस्त्यांच्या दुतर्फा दर दहा मीटर अंतरावर वृक्षारोपण केल्याने आपले शहर हरित व सुंदर होण्यास मदत होणार आहे. या उपक्रमाला अनेकांचे सहकार्य मिळत आहे. प्रत्येक नागरिकाने वृक्षारोपण मोहिमेत सहभागी व्हावे व शहर सुंदर व हरित करण्यासाठी सहकार्य करावे.
– शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी चिंचवड महापालिका

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या या उपक्रमामुळे शहराच्या हरित आच्छादनात लक्षणीय वाढ होईल. तसेच प्रदूषण नियंत्रण, तापमान कमी होणे आणि पर्यावरणस्नेही शहर निर्माण करण्यास मदत होईल. जास्तीत जास्त नागरिकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे.– प्रदीप जांभळे पाटील, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका

पिंपरी चिंचवड शहरात दीड लाख देशी झाडांची लागवड करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यामध्ये ताम्हण, बहावा, नीम, शिसव या वृक्षांसारख्या विविध देशी व पर्यावरणपूरक प्रजातींची झाडे लावली जाणार असून त्यादृष्टीने नियोजन केले आहे.
– महेश गारगोटे, मुख्य उद्यान अधीक्षक , पिंपरी चिंचवड महापालिका

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!