spot_img
spot_img
spot_img

जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त वायसीएम रुग्णालयात जनजागृतीपर कार्यक्रम

पिंपरी, १ ऑगस्ट २०२५ : जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त पिंपरी चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय (वायसीएम) येथील पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण संस्था अंतर्गत कुटुंब नियोजन विभागामार्फत आज स्तनपानविषयक विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात एकूण ९० लाभार्थिनींनी सक्रिय सहभाग घेतला.

पिंपरी चिंचवड महापालिकेचा वैद्यकीय विभाग, भारतीय वैद्यकीय संघटना (आयएमए) भोसरी शाखा आणि इनरव्हील क्लब ऑफ प्राईड निगडी यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्य़क्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ‘स्तनपानाला प्राधान्य द्या – शाश्वत आधार व्यवस्था निर्माण करा” ही स्तनपान सप्ताह २०२५ ची अधिकृत संकल्पनेवर या कार्यक्रमात मातांना स्तनपानाच्या पोषणात्मक, मानसिक व भावनिक लाभांबद्दल सखोल माहिती देण्यात आली. स्तनपानामुळे बाळाला मिळणाऱ्या नैसर्गिक प्रतिकारशक्तीपासून ते आईच्या आरोग्यावर होणाऱ्या सकारात्मक परिणामांपर्यंत अनेक मुद्द्यांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.

यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, वैद्यकीय अधिक्षक डॉ. उज्ज्वला अणदुरकर, आयएमए भोसरी शाखेचे अध्यक्ष डॉ. ललितकुमार धोका, इनरव्हील क्लब ऑफ प्राईड निगडीचे अध्यक्ष कमलजीत कौर, वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी व कुटुंब नियोजन विभागप्रमुख डॉ. शैलजा भावसार, प्रजनन व बाल आरोग्य नोडल अधिकारी डॉ. छाया शिंदे उपस्थित होते.
याप्रसंगी इनरव्हील क्लब ऑफ प्राईड निगडी संस्थेच्या वतीने सर्व लाभार्थिनींना बेबी किट्सचे वाटप करण्यात आले. या किट्समध्ये नवजात बाळांच्या सुरक्षेसाठी व स्वच्छतेसाठी आवश्यक असलेल्या वस्तूंचा समावेश होता. कार्यक्रमाचे निवेदन यशस्विता बानखेले यांनी केले.

स्तनपान हे केवळ पोषण नव्हे, तर आई व बाळ यांच्यातील आत्मिक नात्याचा दुवा आहे. जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त पिंपरी चिंचवड महापालिकेने विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे. आरोग्यदृष्ट्या संवेदनशील विषयांवर अधिकाधिक लोकांपर्यंत योग्य माहिती पोहोचावी, हीच आमची भूमिका आहे.
– विजयकुमार खोराटे, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका

 

स्तनपानासंबंधीचे वैज्ञानिक सत्य समाजात रुजवण्यासाठी सातत्याने जनजागृती गरजेची आहे. अशा उपक्रमांमुळे मातांना योग्य मार्गदर्शन मिळते आणि नवजात बाळांचे आरोग्य अधिक सुदृढ राहते. यामध्ये वैद्यकीय पथक, सामाजिक संस्था आणि स्वयंसेवक यांचे सहकार्य महत्त्वाचे आहे.
– डॉ. लक्ष्मण गोफणे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, पिंपरी चिंचवड महापालिका

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!