अरुण पाडुळे यांनी केली तात्काळ कारवाईची मागणी
शबनम न्यूज | प्रतिनिधी
चिखली परिसरातील स्पाईन रोडवर टेम्पो, बस तसेच ट्रक यांचे अनधिकृत पार्किंग दिवसेंदिवस वाढत चालले आहे. यामुळे रस्ता अरुंद होत असून वाहतूक कोंडी व अपघातांचे प्रमाण सतत वाढत आहे. नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
विशेषतः अटल बिहारी वाजपेयी गार्डन परिसरात शनिवार आणि रविवारी संध्याकाळी रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वाहनं उभी राहतात. त्यामुळे वाहतूक कोंडी शिगेला पोहोचते. या रस्त्यावरून जाणाऱ्या जेष्ठ नागरिकांना व महिलांना चालणेही कठीण होते. रस्त्याच्या असुरक्षिततेमुळे लहान मुलांसाठीही धोका निर्माण झाला आहे.
या गंभीर समस्येकडे लक्ष वेधत सामाजिक कार्यकर्ते अरुण पाडुळे यांनी गार्डनबाहेरील अनधिकृत पार्किंग तत्काळ हटवावे, आणि संबंधित वाहनांवर दंडात्मक कार्यवाही करण्यात यावी, अशी जोरदार मागणी केली आहे.
या पार्श्वभूमीवर तअरुण पाडुळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी आज चिखली पोलीस स्टेशनमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल साळुंखे यांची भेट घेऊन परिस्थितीची माहिती दिली. यावर साळुंखे साहेबांनी तात्काळ कारवाई सुरू केली जाईल, असे आश्वासन दिले व कार्यवाही चे आदेशही दिले.
स्थानिक नागरिकांकडून या समस्येवर लवकर तोडगा निघेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.