शबनम न्यूज | प्रतिनिधी
निरंकारी सदगुरू माता सुदीक्षा जी महाराज आणि निरंकारी राजपिता रमीत जी यांच्या असीम कृपाशीर्वादाने “संत निरंकारी सत्संग भवन”, जय जवान नगर खराडी येथे दि. २७ जुलै २०२५, रविवार रोजी सकाळी १०:३० ते १:३० या वेळेत इंग्लिश भाषेच्या माध्यमातून विशाल सत्संग सोहळा संपन्न झाला. या विशेष सत्संगासाठी पुणे झोनमधील भोसरी, आळेफाटा, पुणे, नानगाव, पिंपरी-चिंचवड, आव्हाळवाडी आदी ठिकाणांहून युवा संत मोठ्या संख्येने उपस्थित होते. जगभर ६० हून अधिक देशांत पोहोचलेली संत निरंकारी मिशनची विचारधारा इंग्रजी या जागतिक भाषेमार्फत अधिक व्यापक स्वरूपात युवकांपर्यंत पोहोचवण्याचा उद्देश या कार्यक्रमामागे होता.
याप्रसंगी प्रवीण छाब्रा (मुंबई) यांनी आपले विचार व्यक्त करताना सांगितले कि प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये अशी एक वेळ येते कि ईश्वराला प्राप्त करण्याच्या दिशेने प्रकृती त्याला अग्रेसर करत असते. ज्याला ती संधी ओळखता आली आणि ज्याने पूर्ण सद्गुरूंकडून एक ईश्वर ,परमात्म्याची ओळख करून घेतली त्याचे जीवन धन्य झाले आहे. संत निरंकारी मिशनच्या विचारधारेविषयी बोलताना त्यांनी मिशनचा मूलमंत्र ‘ एका ला जाणा, एका ला माना, एक व्हा ‘ चे विश्लेषण करताना स्पष्ट केले कि निरंकारी मिशन आज जगाला हाच संदेश देते कि ज्या ईश्वराने हि सर्व सृष्टी निर्माण केली आहे अशा प्रभूला जाणून त्याच्यावर विश्वास ठेऊन त्याच्याशी एकरूप होणे हा मानवी जीवनाचा उद्देश आहे. निरंकारी मिशन केवळ ईश्वराविषयी चर्चा करत नसून अशा सर्वव्यापी परमात्म्याशी ब्रम्हज्ञानाच्या माध्यमातून आत्माचे मिलन घडवून आणत आहे.
आजच्या युगामध्ये विशेषतः युवकांमध्ये जी नकारात्मकता भरलेली आहे ती दूर करण्याचे एकमेव साधन आहे ते म्हणजे संतांची सत्संग, संतांची विचारधारा. कार्यक्रमात युवकांनी इंग्रजी भाषेत गीत, विचार, नाटिका आणि आध्यात्मिक प्रदर्शने सादर करून मिशनच्या दैवी मूल्यांचा प्रभावी प्रसार केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुकीर्ती नेणवणी आणि ललित शर्मा यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल पुणे झोनचे प्रभारी श्री. ताराचंद करमचंदानी यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले.