spot_img
spot_img
spot_img

PCMC : महापालिकेच्या मोशी रुग्णालय इमारतीच्या बांधकामाला गती

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने मोशी येथे ७०० खाटांच्या भव्य रुग्णालय उभारणीच्या प्रकल्पाला वेग आला आहे. डिसेंबर २०२३ मध्ये सुरू झालेल्या या ३४० कोटींच्या प्रकल्पाची उभारणी १५ एकर जागेवर करण्यात येत आहे. यशवंतराव चव्हाण रुग्णालयास सहाय्यक ठरणाऱ्या या प्रकल्पामुळे शहरातील वाढत्या लोकसंख्येला आधुनिक आरोग्य सुविधा मिळणार आहेत. सुमारे ५७,४५० चौ.मी. इतके बांधकाम क्षेत्र असलेल्या आणि तळमजला + ८ मजली इमारतीसह उभारल्या जाणाऱ्या या रुग्णालयाचे आराखडे अत्याधुनिक आणि सुसज्ज वैद्यकीय कॅम्पसला दृष्टिक्षेपात ठेऊन तयार करण्यात आले आहेत. यामध्ये भविष्यातील शैक्षणिक व निवासी पायाभूत सुविधांचाही समावेश करण्यात येणार आहे. सद्यस्थितीत तळमजल्याचे काम पूर्ण झाले असून, तिसऱ्या मजल्यापर्यंतच्या बांधकाम पुर्णत्वाकडे आले आहे. काम नियोजित वेळापत्रकानुसार सुरू असून लवकरच नागरिकांना जागतिक दर्जाचे, रुग्णाभिमुख आणि पर्यावरणस्नेही आरोग्यसेवा अनुभवता येणार आहे.

रुग्णालयाचे महत्त्वाचे टप्पे:

  • खोदकाम व बेसमेंटचे काम १००% पूर्ण
  •  सद्यस्थितीत तिसऱ्या मजल्यापर्यंतचे बांधकाम पूर्ण
  •  आर्थिक प्रगती: सुमारे १५.८ टक्के
  •  भौतिक प्रगती: ३५ टक्के (तिसऱ्या मजल्यापर्यंतच्या संरचना कामाच्या प्रगतीनुसार)
  •  ३६ महिन्यांच्या वेळापत्रकानुसार प्रकल्प प्रगतीपथावर व रुग्णालयाची रचना व सुविधा:
  •  २७४ चारचाकी व २५० दुचाकी वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था
  •  आपत्कालीन सेवा, ओपीडी, रेडिओलॉजी, डायग्नोस्टिक, बालरोग, स्त्रीरोग, मानसिक आरोग्य, डे केअर यांसारख्या विभागांचे नियोजन
  •  सर्वात वरील मजल्यांवर आयसीयू, डायालिसिस, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, वॉर्ड्स, स्पेशल रूम्स
  •  आठव्या मजल्यावर कर्मचाऱ्यांचे निवास, लेक्चर हॉल व डॉरमिटरीची सुविधा

हरित व ऊर्जा कार्यक्षम रचना:

  • EDGE व IGBC Gold मानांकनासाठी पात्र रचना
  •  २०० केएलडी क्षमतेचा सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प
  •  २०० किलोवॅट क्षमतेचे रूफटॉप सोलर पॅनल्स
  •  पावसाळी पाण्याचे संकलन, एलईडी लाईट्स (सेंसरसह), एएसी ब्लॉक बांधकाम, सेंद्रिय कचरा प्रक्रिया यंत्रणा
  •  पीएसए ऑक्सिजन जनरेटर व प्न्युमॅटीक ट्युब सिस्टीम (पीटीएस)
  •  अग्निसुरक्षा उपाययोजना: प्री-अ‍ॅक्शन सिस्टिम, फायर कर्टन, CO₂ सेन्सर्स, स्ट्रेचर रॅम्प्स, सुसंगत आपत्कालीन मार्ग

 भविष्यकालीन नियोजन:

  •  २०० खाटांचे कर्करोग रुग्णालय
  •  १५० विद्यार्थी क्षमतेचे वैद्यकीय महाविद्यालय (पीजी, नर्सिंग, फिजिओथेरपीसह)
  •  निवासी इमारतींचे नियोजन

या सर्व सुविधांचे काम पूर्ण झाल्यावर पिंपरी चिंचवड परिसरात सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने रुग्णांना तसेच वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी सुविधा उपलब्ध होणार आहे.

“पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने मोशी येथे उभारले जाणारे ७०० खाटांचे रुग्णालय म्हणजे शहरातील आरोग्य क्षेत्रातील एक ऐतिहासिक पाऊल आहे. वाढत्या लोकसंख्येला आधुनिक व दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याचा आमचा संकल्प आहे. वैद्यकीय शिक्षण, आपत्कालीन सेवा आणि पर्यावरणपूरक पायाभूत सुविधा यांचा समन्वय साधत हा प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी महापालिका प्रयत्नशील आहे. “– शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी चिंचवड महापालिका

“मोशीतील हे बहुविध सुविधा असलेले आधुनिक रुग्णालय केवळ शहरातील आरोग्यसेवेच्या नव्या पर्वाची सुरुवात ठरेल. यामुळे सामान्य रुग्णांना त्वरित आणि दर्जेदार सेवा मिळतीलच, पण वैद्यकीय शिक्षणासाठी आवश्यक पायाभूत सुविधा देखील उभारण्यात येत आहेत. संपूर्ण प्रकल्पाचा वेग, गुणवत्ता आणि भविष्यातील गरजांचा विचार करता, हे रुग्णालय एक आदर्श मॉडेल ठरेल.”– विजयकुमार खोराटे, अतिरिक्त आयुक्त (२), पिंपरी चिंचवड महापालिका

“मोशीतील हे भव्य रुग्णालय केवळ एक आरोग्य सुविधा नसून, हे पिंपरी चिंचवडच्या आरोग्यदृष्ट्या शाश्वत भविष्यासाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. या प्रकल्पाचे काम नियोजित वेळापत्रकानुसार सुरू असून, पर्यावरणस्नेही व ऊर्जा कार्यक्षम रचनांसह उच्च दर्जाच्या आरोग्य सेवा देण्याचा आमचा निर्धार आहे.”–  प्रमोद ओंभासे, मुख्य अभियंता, पिंपरी चिंचवड महापालिका

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!