पीसीईटीच्या मुकुटात आणखी एक मानाचा तुरा
शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या अंतर्गत २००९ मध्ये स्थापन झालेल्या एस. बी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (एसबीपीआयएम) या संस्थेने व्यवस्थापन शिक्षण क्षेत्रात एक प्रतिष्ठित आणि विद्यार्थी प्रिय एमबीए संस्था म्हणून नाव कमावले आहे. येथून महाराष्ट्रासह देशभरातील विविध जिल्ह्यांतून आलेल्या २५०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी एमबीएची पदवी प्राप्त केली आहे. यूजीसी आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून शैक्षणिक स्वायत्तता प्रदान करण्यात आली आहे याचा पीसीईटी च्या विश्वस्त मंडळाला सार्थ अभिमान आहे, असे ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे यांनी सांगितले. तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न पीएचडी संशोधन केंद्रातून आजपर्यंत ३८ विद्यार्थ्यांनी पीएचडी पदवी प्राप्त केली आहे तर ५५ विद्यार्थी हे पीएचडीचे संशोधन करत आहेत हे देखील गौरवास्पद आहे असे लांडगे म्हणाले.
पीसीईटीच्या स्थापनेला ३३ वर्षे पूर्ण होत असताना यावर्षी एसबीपीआयएम ला स्वायत्तता मिळाली. महाविद्यालयाच्या नियामक मंडळाच्या प्रथम बैठकीत ज्ञानेश्वर लांडगे बोलत होते. यावेळी पीसीटीच्या उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त तथा पीसीयूचे कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, एसबीपीआयएम च्या संचालक डॉ. किर्ती धारवाडकर, विद्यापीठ नामनिर्देश सदस्य डॉ. राजेश पहुरकर, उद्योजक सागर बाबर, उद्योग तज्ञ राजेश माल्ल्या, डॉ. रूपाली कुदरे, डॉ. काजल माहेश्वरी, डॉ. भूषण परदेशी, डॉ. अनिषकुमार कारिया आदी उपस्थित होते.
डॉ. किर्ती धारवाडकर यांनी सांगितले की, देशाच्या सर्वांगीण विकासामध्ये व्यवस्थापन क्षेत्रात कुशल मनुष्यबळ तयार करण्याच्या उद्देशाने प्रेरित झालेल्या या संस्थेमध्ये जबाबदार तसेच सुसंस्कृत नागरिक घडवण्याचे काम प्राध्यापक वर्ग करीत आहे. एसबीपीआयएम मध्ये ८० टक्के प्राध्यापक पीएचडी धारक आहेत.
ही संस्था मूल्यांवर आधारित उत्तम शिक्षण देणारे केंद्र आहे. आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना केवळ पदवी नाही तर उद्योग जगतात टिकणारे कौशल्य, आचारसंहिता आणि सामाजिक भान देतो. या संस्थेचे अनेक माजी विद्यार्थी देश, विदेशात विविध क्षेत्रांमध्ये यशस्वीपणे कार्यरत आहेत. संस्थेला “नॅक ए प्लस” दर्जा आणि “एनबीए” मान्यता प्राप्त एमबीए प्रोग्राम आहे. तसेच आता पुढील पिढीला उद्योगसज्ज आणि जागतिक नागरिक घडविण्यासाठी अधिक सक्षमपणे काम करू असा विश्वास डॉ. धारवाडकर यांनी व्यक्त केला.
प्रास्ताविक डॉ. रूपाली कुदरे, आभार डॉ. कीर्ती धारवाडकर यांनी मानले.