शबनम न्यूज | प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य महिला आयोग आणि यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा) यांच्या संयुक्त विद्यमाने यशदा येथे आयोजित दोन दिवसीय राज्यातील समुपदेशकांसाठी क्षमता बांधणी प्रशिक्षणाचा समारोप आज झाला.
यावेळी महिला आयोगाच्या सदस्य सचिव नंदिनी आवडे, यशदाचे उपमहासंचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, महिला व बाल विकास विभाग आयुक्तालयातील ‘मिशन शक्ती’ राज्य अभियान समन्वयक प्रमोद निकाळजे आदी उपस्थित होते.
निकाळजे यांनी यावेळी मिशन शक्ती या अभियानाची माहिती दिली. बेटी बढाओ बेटी पढाओ, प्रधानमंत्री मातृ वंदन योजना, पाळणा, वन स्टॉप सेंटर, हेल्प लाइन, मिशन शक्ती, शक्ती निवास आदी योजनांची सखोल माहिती त्यांनी दिली. केंद्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाने ‘मिशन शक्ती’ या नावाने एक मोबाईल ॲप विकसित केले असून महिलांची सुरक्षा, सक्षमीकरण तसेच महिलांसाठी केंद्रीय योजनांची माहिती, मदत यासाठी हे ॲप उपयुक्त ठरणार आहे. यात ‘एआय’चा वापर करण्यात आला असून चॅटबोटच्या माध्यमातून माहिती मिळविता येणार आहे, असे त्यांनी सांगितले.
यावेळी उपस्थित महिला व पुरुष समुपदेशकांनी प्रशिक्षणाबाबत अभिप्राय आपल्या मनोगतातून व्यक्त केले. महिलांचे प्रश्न, अडचणी जाणून घेऊन त्यांना योग्य पद्धतीने मदत करण्यासाठी या प्रशिक्षणातून उपयुक्त माहिती मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
यावेळी यशदाच्या महिला सबलीकरण कक्षामार्फत आणि महिला आयोगाच्या साहाय्याने निर्मित ‘क्षितिजा’ सक्षमीकरणाच्या वाटा या संदर्भ साहित्य पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. प्रशिक्षण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र यावेळी समुपदेशकांना प्रदान करण्यात आले.