शबनम न्यूज | प्रतिनिधी
ऊर्से (ता. मावळ) येथे झालेल्या घरफोडीप्रकरणी गुन्हे शाखा युनिट पाचच्या पथकाने अवघ्या आठ दिवसांत चार अट्टल चोरट्यांना अटक केली. त्यांच्याकडून २५ लाख ३२ हजार रुपये किमतीचे ३५.६ तोळे सोन्याचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली कार जप्त केली.
यशोदास विजय राठोड (वय २७, रा. ओझर्डे, ता. मावळ), रितेश करणसिंग राठोड (२७, रा. वेहेरगाव, ता. मावळ), आकाश रवी मैनावत (२९, रा. भादस, ता. मुळशी), ऋतिक रवी मैनावत (२१, रा. भादस, ता. मुळशी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तर अभिषेक रंजित नानावत (रा. पौड) हा फरार आहे. चोरीला गेलेल्या २७ लाख १२ हजार रुपये किमतीच्या ३६.६ तोळे वजनाच्या सोन्याच्या दागिन्यांपैकी ३५.६ तोळे सोन्याचे दागिने पोलिसांनी संशयितांकडून जप्त केले.
घटनास्थळ ते लोणावळा परिसरातील सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे या टोळीचा छडा लावला. साईनगर वनविभागाजवळ जंगलात सापळा रचून त्यांना अटक करण्यात आली. ही उल्लेखनीय कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष कसबे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक श्रीधर भोसले यांच्या नेतृत्वात कारवाई झाली.