शबनम न्यूज | प्रतिनिधी
ससून रूग्णालयातील वाॅर्ड क्रमांक ४० मध्ये गोंधळ घालून तोडफोड करणाऱ्या महिलेसह दोघांविरुद्ध बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींनी प्रवेशद्वाराची काच फोडून ईसीजी यंत्राची तोडफोड केली, तसेच सुरक्षारक्षकाला धमकावून धक्काबुक्की केली.
शासकीय कामात अडथळा आणणे, तसेच तोडफोड केल्याप्रकरणी महिलेसह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सुरक्षारक्षक संदीप ज्ञानोबा जाधव (वय २७, रा. सदाआनंदनगर, मंगळवार पेठ) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ससून रुग्णालयात आरोपींच्या नात्यातील एक जण उपचार घेत आहे. सोमवारी (१५ जुलै) दुपारी एकच्या सुमारास ससूनमधील वाॅर्ड क्रमांक ४० च्या परिसरात दोघे आले होते. त्यांनी उपचार घेणाऱ्या नातेवाईकाला भेटायचे आहे, असे सांगितले. नातेवाईकांना भेटण्यासाठी वेळ ठरवून दिली आहे. वाॅर्डात जाता येणार नाही, असे सुरक्षारक्षक जाधव यांनी दोघांना सांगितले.
या कारणावरुन दोघांनी रुग्णालयाच्या आवारात गोंधळ घालण्यास सुरुवात केली. जाधव यांनी त्यांना गोंधळ घालू नका, असे सांगितले. त्यानंतर आरोपींनी सुरक्षारक्षक जाधव आणि सहकाऱ्यांना धक्काबुक्की केली. शिवीगाळ करुन काठीने मारहाण केली. वाॅर्ड क्रमांक ४० च्या प्रवेशद्वाराची काच फोडली, तसेच ईसीजी यंत्राची तोडफोड केली.