शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक मागील मैदानात बेशिस्तपणे वाहन पार्किंग केल्यामुळे परिसरात वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. कोणतीही शिस्त न पाळता वाहने रस्त्यावर, गेटसमोर आणि चौकांत पार्किंग केली जात असल्याने रस्ता पूर्णपणे अडवला जातो. त्यामुळे चालणाऱ्यांपासून रुग्णवाहिकांपर्यंत सर्वांनाच त्रास सहन करावा लागत आहे.
बेशिस्त पार्किंगमुळे तासन्तास वाहतूक ठप्प होते. स्थानिक नागरिक आणि व्यापाऱ्यांनी अनेक वेळा प्रशासनाकडे तक्रार करूनही कोणतीच ठोस कारवाई झालेली नाही. काही वेळा पोलीस कर्मचारी येतात पण त्यांच्या अनुपस्थितीत बेशिस्तपणा पुन्हा सुरू होतो.
स्मारकासारख्या महत्वपूर्ण ठिकाणी अशा अनागोंदीने परिसराची शान मलीन होत आहे. यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. पार्किंगसाठी स्वतंत्र जागा निश्चित करून कडक शिस्त लावण्याची गरज आता ऐरणीवर आहे. दरम्यान, केवळ पिंपरी चौकातच नव्हे तर महापालिका भवनासमोरही मुंबई-पुणे मार्गावर चारचाकी वाहने पार्क केली जातात. यामुळेही मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होते. तसेच महापालिकेच्या आऊट गेटकडून गांधीनगरकडील मार्गावरही बेशिस्तपणे वाहने पार्क केली जातात. याकडे वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे.