शबनम न्यूज | प्रतिनिधी
लग्नाचे आमिष दाखवून रबडीमधून गर्भपाताची गोळी खायला घालून प्रेयसीचा गर्भपात केल्याप्रकरणी आणि लग्न करण्यास नकार दिल्याप्रकरणी प्रियकराच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार हिंजवडी येथे ३१ डिसेंबर २०२३ ते ३ जुलै २०२५ या कालावधीत घडला. आदर्श वाल्मीक मेश्राम (वय २८, लक्ष्मी चौक, हिंजवडी, मूळ रा. बल्हारशहा, चंद्रपूर) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. हिंजवडी पोलिस ठाण्यात २८ वर्षीय पीडित तरुणीने फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदर्श मेश्राम आणि पीडित तरुणी एकमेकांना महाविद्यालयीन जीवनापासून ओळखत होते. आदर्श हिंजवडीमधील कंपनीत काम करतो, तर पीडित तरुणी इलेक्ट्रिकल ठेकेदार आहे. २०१८ पासून दोघांचे प्रेमसंबंध होते. त्याने तिला लग्नाचे आमिष दाखविले होते. मात्र, लग्नाचा विषय काढला असता टाळाटाळ केली. मागील वर्षी हॉटेलमध्ये जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. त्याला विरोध केला असता त्याने तिला मारहाण केली. २३ जून २०२५ रोजी आदर्शचा वाढदिवस होता. त्याच्या वाढदिवसाला तरुणी यवतमाळ येथून पुणे येथे आली. त्यावेळी त्याच्या मोबाइलमध्ये अन्य तरुणींसोबत फोटो असल्याचे तिला दिसून आले.
दरम्यान, ती गरोदर होती. त्यावेळी त्याची पूर्वीची प्रेमिकाही पीडित तरुणीला भेटली. तिलाही त्याने लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केला होता. त्यानंतर ३ जुलै रोजी त्याने पीडितेला रबडीमधून गर्भपाताची गोळी खायला दिली. इच्छेविरुद्ध तिचा गर्भपात केला. त्यानंतर लग्न करण्यास नकार दिला. काही दिवस उपचार घेतल्यानंतर तिने पोलिसात धाव घेतली. त्याचा शोध सुरू आहे. त्याला अटक करण्यासाठी पथक पाठवले आहे. पोलिसांनी याप्रकरणी प्रियकर आदर्श मेश्राम यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करत आहेत.