spot_img
spot_img
spot_img

सती प्रथेवर आधारलेला ‘सत्यभामा’ प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज

  • ८ ऑगस्ट रोजी संपूर्ण महाराष्ट्रात होणार प्रदर्शित

महिलाप्रधान चित्रपटांनी नेहमीच समाजाला आरसा दाखवत प्रेक्षकांच्या मनावर गारूड केलं आहे. आजवर अनेक महिलाप्रधान चित्रपटांनी केवळ समाजात स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचाराला वाचा फोडण्याचे काम केले नसून, काही आदर्शवत स्त्री व्यक्तिमत्त्वांच्या जीवनावर प्रकाशही टाकला आहे. अशाच प्रकारचे प्रेरणादायी कथानक असलेला ‘सत्यभामा’ हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज आहे. नुकतीच या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. सती जाण्याच्या अमानवी प्रथेवर आधारित असलेला ‘सत्यभामा’ ८ ऑगस्ट रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

श्री साई श्रुष्टी फिल्म्स एलएलपी प्रस्तुत ‘सत्यभामा – अ फरगॉटन सागा’ या चित्रपटाची निर्मिती मनीषा पेखळे, सारंग मनोज, अंकुर सचदेव आणि वीरल दवे यांनी केली आहे. सारंग मनोज आणि अभिजीत झाडगावकर यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा यशस्वीपणे सांभाळली आहे. कथा, पटकथा आणि संवादलेखन मनीषा पेखळे यांनी केले आहे. एक लक्षवेधी मोशन पोस्टर प्रदर्शित करून ‘सत्यभामा’ येणार असल्याचे निर्मात्यांनी घोषित केले आहे. मोशन पोस्टरवर आगीत होळपरणाऱ्या स्त्रीचा हात धरलेला पुरुषाचा हात पाहायला मिळतो. पुरूषाच्या हातात राखी दिसत आहे. मनाला चटका लावणारे हे पोस्टर ‘सत्यभामा’बाबत उत्सुकता वाढविण्याचे काम करणारे आहे. हा चित्रपट श्रीमती मनीषा पेखळे यांनी लिहिलेल्या ‘सत्यभामा – एक विसरलेली गाथा’ या कादंबरीवर आधारलेला आहे. ही कथा सती प्रथेला बळी पडलेल्या सर्व निष्पाप स्त्रियांना समर्पित आहे. सतीचे दु:ख जगासमोर आणण्याचा प्रयत्न या चित्रपटाद्वारे करण्यात आला आहे. १९व्या शतकातील ही काल्पनिक कथा आहे. या चित्रपटाबाबत दिग्दर्शक द्वयी म्हणाले की, ‘सत्यभामा’ची १९व्या शतकातील कथा आजही मनाला प्रचंड वेदना देणारी आहे. ही भाऊ बहिणीच्या प्रेमाची, त्यांच्या जीवनातील आनंदाच्या क्षणाची, त्यागाची व त्यांनी केलेल्या संघर्षाची गोष्ट आहे. डोळ्यांत अंजन घालणारी एक तेजस्वी आणि प्रेरणादायी कथा दर्जेदार निर्मितीमूल्यांच्या आधारे मनोरंजकरीत्या ‘सत्यभामा’मध्ये सादर करण्यात आली आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या रूपात प्रेक्षकांना मनोरंजनाचे एक परीपूर्ण पॅकेज पाहायला मिळेल असेही ते म्हणाले.

या चित्रपटात माधव अभ्यंकर, अभिजीत आमकर, भाविका निकम, सृष्टी मालवंडे, ज्योती पाटील, सारंग मनोज, ज्ञानेश्वर शिंदे आदी कलाकारांच्या भूमिका आहेत. डिओपी जितेंद्र रामचंद्र आचरेकर यांनी सिनेमॅटोग्राफी केली असून, संकलन निलेश गावंड यांचे आहे. मनीषा पेखळे यांनी लिहिलेल्या गीतांना संगीतकार निखिल महामुनी यांनी संगीत दिले आहे. हनी सातमकर यांनी पार्श्वसंगीत दिले असून, सुमीत ओझा यांनी व्हीएफएक्स केले आहेत. कला दिग्दर्शन सचिन एच. पाटील यांचे, तर कोरिओग्राफी नरेंद्र पंडीत यांची आहे. शीतल लीना लहू पावसकर यांनी कॉस्च्युम डिझायनिंगसह स्टाईलचे काम पाहिले असून, नितीन सुचिता दांडेकर यांनी मेकअप केला आहे. मोहित सैनी या चित्रपटाचे फाईट मास्टर असून, अकबर शेख यांनी प्रोडक्शन कंट्रोलर म्हणून काम पाहिले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!