शबनम न्यूज | प्रतिनिधी
वाकड गावठाण हद्दीतील सर्वे नंबर २ मध्ये असलेल्या नैसर्गिक ओढ्याला संरक्षण भिंत बांधण्याची मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष युवा नेते विशाल वाकडकर यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ड क्षेत्रीय कार्यालयातील स्थापत्य विभागाकडे सविस्तर निवेदनाद्वारे केली.
या निवेदनात त्यांनी स्पष्टपणे नमूद केले आहे की सदर ठिकाणी संरक्षण भिंत नसल्यामुळे पावसाळ्यात अपघात होण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे. ओढ्याच्या काठावरून नागरिकांची व लहान मुलांची रोज ये-जा होत असल्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे.
तसेच ओढ्याला संरक्षण भिंत नसल्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता पसरली असून, डासांची उत्पत्ती, साचलेले पाणी यामुळे डेंग्यू, मलेरिया यांसारखे रोग फैलावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याचा थेट परिणाम स्थानिक नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे.
विशाल वाकडकर यांनी आपल्या निवेदनात ओढ्याला दोन्ही बाजूंनी तातडीने संरक्षण भिंत बांधून नागरिकांचे जीवित व मालमत्तेचे संरक्षण करण्याची, तसेच परिसरात स्वच्छ व आरोग्यदायी वातावरण निर्माण करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना त्वरित राबवण्याची मागणी केली आहे.
या विषयावर लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घेण्यात यावा, अशी अपेक्षा परिसरातील नागरिकांनीही व्यक्त केली आहे.