spot_img
spot_img
spot_img

‘‘हिंजवडी आयटी पार्क ’’ समस्यामुक्त करण्यासाठी ‘‘सिंगल पॉईंट ॲथॉरिटी’’

शबनम न्यूज | प्रतिनिधी

हिंजवडी आयटी पार्कची समस्या सोडवण्यासाठी मेट्रोचे काम डिसेंबर अखेर पूर्ण करण्यात येईल. वाहतूक सक्षम करण्यासाठी प्रस्तावित रस्ते आणि संबंधित विकासकामे मार्गी लावण्यासाठी सर्व शासकीय अस्थापनांसाठी ‘‘सिंगल पॉईंट ऑथॅरिटी’’ तयार केली जाईल, असे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
हिंजवडी आयटी पार्कमधील वाढत्या नागरी व वाहतूक समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी IT फोरम आणि सोसायटी फेडरेशनच्या प्रतिनिधींनी आज विधानभवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची यांची भेट घेतली. ही महत्त्वपूर्ण बैठक भाजपाचे आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने आयोजित केली होती. यावेळी आमदार शंकर मांडेकर, आमदार शंकर जगताप उपस्थित होते.

आयटी फोरमचे सचिन लोंढे, सोसायटी फेडरेशनचे संजीवन सांगळे यांच्यासह शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यासोबत थेट चर्चा केली. बाणेर-बालेवाडी रेसिडेन्ट असोसिएशन, #UNCLOGHinjawadiITPark मोहीमेतील प्रतिनिधी, फोरम ऑफ आयटी एम्प्लॉईज, हिंजवडी एम्प्लॉईज ॲन्ड रेसिडेन्ट ट्रस्ट, मुळशी को-ऑपरेटीव्ह हौसिंग सोसायटी फेडरेशनचे प्रतिनिधी उपस्थित होते.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका शेखर सिंह, पुणे महानगरपालिका आयुक्त नवकिशोर राम, ‘पीएमआरडीए’चे महानगर आयुक्त योगेश म्हसे, राज्य सरकाचे मुख्य सचिव, एमआयडीसी, प्रोजेक्ट डायरेक्टर नॅशनल हायवे, पोलीस आयुक्त पिंपरी-चिंचवड विनयकुमार चौबे, कार्यकारी संचालक महामेट्रो श्रावण हर्डिकर, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी प्रशासनाची तयारी आणि कार्यवाहीची माहिती दिली.

हिंजवडी आयटी पार्क हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा आयटी हब असून, दररोज सुमारे पाच लाखांहून अधिक आयटी व्यावसायिक येथे ये-जा करतात. मात्र, अपुरी पायाभूत सुविधा, वाहतूक कोंडी, रस्त्यांची दुर्दशा आणि समन्वयाचा अभाव या समस्यांमुळे रहिवासी व कर्मचाऱ्यांचे आयुष्य कठीण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर “हिंजवडी आयटी पार्कला अडथळ्यांमधून मुक्त करा” या मागणीकडे आमदार लांडगे यांनी लक्ष वेधले.

यावेळी पीएमआरडीए प्रशासनाकडून प्रस्तावित रस्ते आणि संबंधित कामांचा ‘रोड मॅप’ याबाबत मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्री यांच्यासमोर प्रेझेंटेशन दिले. तसेच, पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातून हिंजवडीला जोडणारे डीपी प्रस्तावित रस्ते पूर्ण करण्यासाठी भूसंपादन करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने कामाला गती द्यावी. राष्ट्रीय महामर्गाला जोडणारे रस्त्यांची प्रस्तावित कामे मार्गी लावण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत समन्वय करणार आहोत, असे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.

मुख्यमंत्री फडणीस यांचे प्रशासनाला निर्देश :

1. सर्व विभागांच्या समन्वयासाठी ‘‘सिंगल पॉईंट ॲथॉरिटी’’
2. भूमीसंपदानाच्या कामासाठी पीएमआरडीएने पुढाकार घ्यावा.
3. लक्ष्मी चौक येथील पूल सहापदरी करा.
4. डिसेंबर अखेर हिंजवडी मेट्रो सुरू करा.
5. एमआयडीसीने रस्ता रुंदीकरणाची कामे पूर्ण करावी.
6. मेट्रो प्रशासनाने पार्किंगचे प्रोव्हीजन करावे.
7. एक महिन्यामध्ये टीडीआर द्या आणि भूसंपादन करा.
8. अध्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून वाहतूक नियंत्रण करा.
9. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाने वाहतूक संदर्भात अंमलबजावणी करावी.
10. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण प्रशासनाने तातडीने कामे सुरू करावीत.
11. पुनावळे, ताथवडे, भूमकर  चौक अंडरपासचे काम सुरू करावे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयटी फोरम आणि विविध सोसायटी फेडरेशनच्या शिष्टमंडळाला सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यांनी संबंधित शासनाच्या विभागांना तात्काळ कार्यवाहीचे निर्देश दिले. हिंजवडी आयटी पार्क आणि पुणे, पिंपरी-चिंचवड परिसर ट्रॅफिक मुक्त करण्यासाठी सर्व शासकीय अस्थापनांचे नियंत्रण विभागीय आयुक्त पाहतील, असे आदेश मुख्यमंत्री महोदय यांनी दिले आहेत. तसेच प्रस्तावित रस्ते आणि पायाभूत सुविधा सक्षम करण्यासाठी ‘फास्टट्रॅक’ वर कालबद्ध नियोजन करण्यात येणार आहे. हिंजवडी आयटी पार्कच्या समस्यांबाबत पहिल्यांदाच अशी बैठक घेण्यात आली आणि विशेष म्हणजे फलदायी ठरली आहे.
– महेश लांडगे, आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!