शबनम न्यूज | प्रतिनिधी
नाशिक : विकासाची प्रक्रिया केवळ राज्याच्या एका भागापुरती मर्यादित न ठेवता राज्याच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य असल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या विकासाचा रोडमॅपच नव उद्योजकांपुढे मांडला. कॉन्फडेरेशन ऑफ़ इंडियन इंडस्ट्री (सीआयआय) यंग इंडियन्सच्या नाशिक शाखेतर्फे पश्चिम क्षेत्र परिषदेने आयोजित संवादात नाशिकच्या विकासालाही चालना देण्याचा निर्धारही मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.
सीआयआय यंग इंडियन्सच्या नाशिक शाखेतर्फे पश्चिम क्षेत्र परिषदेच्या तीन दिवसीय बैठकीचा समारोप आज मुख्यमंत्री फडणवीस यांच्या संवादाने झाला. सीआयआयचे राष्ट्रीय अध्यक्ष तरंग खुराणा आणि न्यूज १८ चे अँकर आनंद नरसिंहन यांनी त्यांच्याशी संवाद साधला.
यावेळी आमदार सीमा हिरे, आमदार देवयानी फरांदे, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्यासह दीपक बिल्डर्सचे दीपक चंदे, यंग इंडियन्सच्या पश्चिम क्षेत्राचे अध्यक्ष कृणाल शहा, वेदांत राठी, नाशिक शाखेचे संस्थापक अध्यक्ष जनक सारडा, नाशिक शाखेचे अध्यक्ष हर्ष देवधर, पारुल धाडीच, भाविक ठक्कर उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सर्वच प्रश्नांना दिलखुलास उत्तरे दिली आणि त्याचबरोबर राज्याच्या विकासाची दिशाही स्पष्ट केली. कार्यक्षम प्रशासन, निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी याद्वारे विकास प्रक्रियेला गती दिली जात असल्याचे त्यांनी नमूद केले. आगामी कुंभमेळा, त्याअनुषंगाने होणारी विकासकामे याबाबतही त्यांनी नाशिकरांना आश्वस्त केले.