शबनम न्यूज | प्रतिनिधी
आळंदी पोलिस स्टेशनच्या हद्दीत ओव्हरटेक करण्याच्या कारणावरून २२ वर्षीय तरुणास बेदम मारहाण करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीस राजगुरूनगर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश ए. एस. सय्यद यांनी सात वर्षे सक्तमजुरी व एक लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. संतोष वासुदेव घुंडरे (वय ३५ रा. आळंदी, ता. खेड) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.
या खटल्याची माहिती अशी, दि.२१ नोव्हेंबर २०२१ रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास गोपाळपुरा आळंदी येथे दुचाकीवरून परमेश्वर पुरुषोत्तम अंभोरे व त्याचा मित्र बाहेरगावरून घरी येत होते. आळंदी गोपाळपुरा येथे घरी जात असताना त्यांच्या समोर हुंडाई कंपनीची गाडी मध्यभागी उभी होती व तिच्या समोरून येणाची चारचाकी वाहने उभी होती. त्यावेळी मोटारसायकलसमोरील वाहनास डाव्या बाजूने ओव्हरटेक करून जात असताना चारचाकी वाहनातील चालक संतोष घुंडरे याने मोठमोठ्याने अर्वाच्य व घाणेरड्या भाषेत शिव्या दिल्या. याचा जाब विचारल्याने त्याने जाड लाकडी दांडक्याने परमेश्वर अंभोरे यास डाव्या हातावर, डोक्यावर, डाव्या कानावर, दंडावर सात ते आठ वेळा जोरजोराने फटके मारले.
या मारहाणीत परमेश्वर अंभोरे यांच्या नाकातून व कानातून रक्तस्राव झाला होता. याबाबत पुरुषोत्तम अंभोरे यांनी आळंदी पोलिसात फिर्याद दिली होती. हा राजगुरूनगर खटला येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश ए. एस. सय्यद यांच्यापुढे सुरू होता. त्याचा निकाल त्यांनी (दि.३) दिला. सरकारी पक्षाच्या वतीने सहायक सरकारी अभियोक्ता मिलिंद पांडकर यांनी ९ साक्षीदार तपासले. यामध्ये आरोपी संतोष वासुदेव घुंडरे याला सात वर्षे सक्तमजुरी व एक लाख रुपये दंडाची शिक्षा दंड न भरल्यास एक महिना सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. कोर्ट पैरवी म्हणून पोलिस कॉन्स्टेबल वाय. एस. गावडे, सांडभोर यांनी काम पाहिले.