शबनम न्युज
मुंबई, – चिंचवड विधानसभा मतदारसंघातील हिंजवडी आयटी पार्क व परिसरातील वाढती वाहतूक कोंडी, अपुऱ्या रस्त्यांची स्थिती व प्रशासनातील समन्वयाचा अभाव या गंभीर समस्यांकडे आमदार शंकर जगताप यांनी राज्याच्या पावसाळी अधिवेशनात लक्ष वेधले. या विषयावर लक्षवेधी सूचना सादर करत त्यांनी वाहनचालक व आयटीयन्सच्या दैनंदिन त्रासाबद्दल आवाज उठवला.
विधानसभेत बोलताना आमदार जगताप यांनी सांगितले की, “हिंजवडी फेज १, २ व ३ कडे येणाऱ्या नागरिकांना व आयटीयन्सना भूमकर चौक, डांगे चौक, लक्ष्मी चौक, ताथवडे, वाकड, पुनावळे, ॲम्स्टरडॅम कंपनीमार्गे जाणे भाग पडते. परिणामी, या रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडी होते. या भागात ३० मीटरचा रिंग रोड, वाकड ते फेज थ्री मुळा नदीच्या पात्रातून रस्ता विकसित करणे शक्य आहे का, असा सवाल त्यांनी सभागृहात उपस्थित केला.
त्याचबरोबर, हिंजवडी आयटी पार्कमधील नागरिकांनी वाहतूक समस्येमुळे थेट न्यायालयात जनहितार्थ याचिका दाखल केली असून, त्यामुळे पीएमसी, पीसीएमसी, पीएमआरडीए आणि अन्य यंत्रणांमध्ये समन्वय साधण्यासाठी एकच वाहतूक नियोजक (Traffic Planner) नेमण्याची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
सार्वजनिक वाहतुकीसाठी निधी, स्मार्ट सिग्नलिंग प्रणालीची मागणी
शंकर जगताप यांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी शासनाने निधी मंजूर करून इंटेलिजंट स्मार्ट ट्रॅफिक सिग्नल सिस्टीम लागू करण्याची गरजही व्यक्त केली. ‘Urban Plan Development’ अंतर्गत फूटपाथची रुंदी कमी करून वाहनांसाठीचा मार्ग (Carriage Way) वाढविण्याचा विचार शासन करेल का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
लवकरच उच्चस्तरीय बैठक – माधुरी मिसाळ
या प्रश्नावर उत्तर देताना राज्याच्या नगरविकास राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ यांनी, “चिंचवड आणि हिंजवडी परिसरातील वाहतूक समस्या गंभीर आहे. लवकरच या संदर्भात सर्व संबंधित विभाग व लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन संयुक्त बैठक घेण्यात येईल,” असे आश्वासन सभागृहात दिले.
तसेच, पुण्यात फर्ग्युसन रोडवर वाहतूक व्यवस्थापनासाठी राबवण्यात येत असलेल्या AI पायलट प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीनंतर हा प्रकल्प पिंपरी-चिंचवड आणि पीएमआरडीए क्षेत्रातही लागू करण्याचा विचार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या मुद्द्यांवर तातडीने पावले उचलून संबंधित विभागांनी प्रभावी कार्यवाही करावी, अशी अपेक्षा मतदारसंघातील नागरिकांनी व्यक्त केली आहे.