जागतिकस्तरावर राज्यातील पर्यटन उद्योगाला
पुणे ग्रॅण्ड चॅलेंज टुर स्पर्धेच्या माध्यमातून चालना मिळणार
– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पुण्यात होणाऱ्या वार्षिक आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सायकलिंग स्पर्धेत विविध स्पर्धकांचा सहभाग, जागतिक क्रीडा कॅलेंडरमध्ये पुण्याचे नाव स्थापित होणार
शबनम न्यूज
मुंबई, राज्य शासनाच्या सहकार्याने पुणे जिल्हा प्रशासन व सीएफआयच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या पुणे ग्रॅण्ड चॅलेंज टुरच्या माध्यमातून वार्षिक आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सायकलिंग स्पर्धेचे आयोजन अतिशय स्तुत्य उपक्रम असून पुण्याला प्रमुख पर्यटन आणि जागतिक क्रीडा केंद्र म्हणून प्रस्थापित करणे या भव्य स्पर्धेमुळे शक्य होणार आहे. पुणे ग्रॅण्ड चॅलेंज टुर स्पर्धा येत्या तीन चार वर्षांत निश्चितचं जागतिकस्तरावर लोकप्रिय स्पर्धा ठरेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले.
विधानभवन येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी पुणे आणि सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया (सीएफ आय ) यांच्यात पुणे ग्रॅण्ड चॅलेंज टुर २०२६ च्या आयोजना साठी सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, मुख्य सचिव राजेश कुमार, सीएफ आयचे अध्यक्ष पंकज सिंघ, जनरल सेक्रेटरी महिंद्र पाल सिंघ यांच्या सह संबंधित अधिकारी, मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासीक वारसा लाभलेली, परंपरा, संस्कृती आणि निसर्गसौंदर्यासह राज्याचे उत्पादन आणि तंत्रज्ञान हब असलेल्या पुण्यात या स्पर्धेच्या निमित्ताने क्रीडा क्षेत्रातील संधीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होईल. त्यासोबतच राज्यात पर्यटकांची संख्या अधिक वाढण्यास आणि त्याद्वारा राज्यातील पर्यटन उद्योगाला चालना मिळण्यासाठी देखील ही स्पर्धा सहाय्यक ठरणारी आहे. पुण्याला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अग्रगण्य पर्यटन स्थळ म्हणून प्रस्थापित करणे यातुन शक्य असून जागतिक क्रीडा कॅलेंडरमध्ये पुण्याचे नाव या स्पर्धैमुळे स्थापित होणार आहे, ही निश्चितच खुप आनंदाची बाब आहे. जगभरातील दोनश देशातून या सायकलिंग क्रीडा प्रकाराचे चाहते आहेत, त्यांच्यापर्यंत या स्पर्धैच्या निमित्ताने पुणे येथील निसर्गसौंर्दय, संस्कृती,परंपरा या सर्व गोष्टी पोहचण्यास मदत होणार असून त्यातुन पर्यटन आणि उद्योग क्षेत्रात मोठी गुंतवणूक आकर्षित होण्याची संधी आहे. तसेच ग्रामीण पुण्यात शाश्वत विकास आणि कनेक्टिव्हिटी, तंदुरुस्ती आणि पर्यावरण जागरूकतेची संस्कृती वाढवण्यास सहायक असलेली ही सायकलिंग स्पर्धा लोकांना एक आरोग्यदायी जीवनशैली स्विकारण्यास प्रोत्साहन देणारे पूरक वातावरण निर्माण करणारी आहे, असे मुख्यमंत्री श्री.फडणवीस यावेळी म्हणाले.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, सायकलिंगचे शहर अशी पुण्याची ओळख आहे. ती वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न या करारातून होईल. आंतरराष्ट्रीय सायकलिंग साठी पुणे शहराचे योगदान मोठे राहिलं, असे उपमुख्यमंत्री श्री.पवार यावेळी म्हणाले.
जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी स्पर्धैच्या आयोजनाबाबत सादरीकरणाद्वारे सविस्तर माहिती दिली. या स्पर्धैस सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया (CFI) यांची मान्यता प्राप्त असून युनियन सायकलिस्ट इंटरनॅशनल (UCI), स्वित्झर्लंड यांच्या मान्यतेची प्रतीक्षा आहे. UCI च्या मान्यतेनंतर लॉस एंजेलिस ऑलिम्पिक २०२८ साठी पात्रता स्पर्धा म्हणून नामांकनास पात्र ठरणार आहे. या स्पर्धैच्या माध्यमातून सह्याद्री पर्वत, किल्ले, ग्रामीण निसर्ग, जलाशय आणि वन्यजीव यासारख्या कमी परिचित तालुक्यांचा आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रचारास मदत होणार आहे.
पुणे जिल्ह्यासोबतच लगतच्या जिल्ह्यातील पर्यटन संस्कृती व साहसी खेळांसाठी (ADVENTURE SPORTS) पुरक वातावरण निर्मितीस चालना मिळेल. स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळून स्थानिक समुदायांसाठी रोजगार निर्मिती आणि पायाभूत सुविधांचा विकास यातुन साध्य होणार आहे.
यावेळी नियोजन अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, अपर मुख्य सचिव क्रीडा अनिल डिग्गीकर, वित्त विभागाचे प्रधान सचिव विजय सौरभ, पर्यटन प्रधान सचिव अतुल पाटणे, विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे मनपा आयुक्त नवल किशोर राम, मुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, प्रधान सचिव अश्विनी भिडे, सचिव श्रीकर परदेशी, यांच्यासह संबंधित वरिष्ठ अधिकारी, मान्यवर उपस्थित होते.