शबनम न्यूज | प्रतिनिधी
महापालिकेने जाहीर केलेल्या सुधारित प्रारूप विकास आराखड्यामध्ये (डीपी) टाकलेल्या विविध रस्ते आरक्षणांमुळे थेरगाव, वाल्हेकरवाडी, बिजलीनगर, चिंचवडेनगर, रहाटणी येथील हजारो रहिवाशी घरे बाधित होऊन बेघर होणार आहेत. त्यामुळे ‘आराखडा नागरिकांसाठी की बिल्डरांसाठी’, ‘जनता उद्ध्वस्त-प्रशासन मस्त’, ‘घरांचे प्रॉपर्टी कार्ड मिळालेच पाहिजे’, ‘जुल्मी प्रशासन परत जा’, ‘रिंररोड रद्द झालाच पाहिजे’, ‘घरे उद्ध्वस्त करून कोणाचा विकास करणार’, ‘घरे नियमित झालीच पाहिजे’, अशा घोषणा देत विकास आराखड्यातील बाधित नागरिकांनी पालिका भवनावर आक्रोश मोर्चा काढला.
स्वाभिमानी घर बचाव संघर्ष चळवळीच्या माध्यमातून महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला. पिंपरी येथील महापालिकेच्या प्रवेशद्वारावर मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. या मोर्चात स्वाभिमानी घर बचाव संघर्ष चळवळीचे समन्वयक धनाजी येळकर पाटील, शिवाजी इबीतदार, शिवाजी पाटील, रमेश पिसे, राजश्री शिरवळकर, राजू पवार, प्रमोद शिंदे, मनोज पाटील, किशोर पाटील, रामचंद्र ढेकळे, वैशाली कदम, विद्या पंडित यांच्यासह मोठ्या संख्येने महिला, पुरुष सहभागी झाले होते.
सुधारित प्रारूप विकास आराखड्यामध्ये टाकलेल्या आरक्षणांमुळे थेरगाव, वाल्हेकरवाडी, बिजलीनगर, चिंचवडेनगर, रहाटणी येथील हजारो रहिवासी घरे बाधित होऊन बेघर होणार आहेत. त्यामुळे हा आराखडा पूर्णपणे तातडीने रद्द करण्याची मागणी चळवळीचे समन्वयक धनाजी येळकर पाटील यांनी केली.
दरम्यान, आंदोलकांचे निवेदन अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील यांनी स्वीकारले. रिंगरोड बाधित रहिवाशी नागरिकांच्या मागणीचा सकारात्मक विचार केला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.