spot_img
spot_img
spot_img

शहरातील रस्त्यांचा सर्वसमावेशक विकास होणे गरजेचे – आयुक्त शेखर सिंह

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड शहर हे वेगाने विकसित होणाऱ्या महानगरांपैकी एक असून, येथील नागरी समस्यांवर दीर्घकालीन आणि समतोल उपाययोजना राबवण्यावर महापालिकेचा भर आहे. शहरामध्ये केवळ वाहतूक सुरळीत करणे एवढ्यावर रस्त्यांचा विकास मर्यादित न ठेवता, त्या जागा सर्वांसाठी सुयोग्य, सुरक्षित आणि सर्वसमावेशक व्हाव्यात यासाठी एक व्यापक दृष्टीकोन स्वीकारणे गरजेचे आहे, असे मत आयुक्त शेखर सिंह यांनी व्यक्त केले.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने शाश्वत शहरी गतिशीलता या विषयावरील तीन दिवसीय परिषद व प्रशिक्षण सत्राचे आयोजन चिंचवड येथील ऑटो क्लस्टर येथे करण्यात आले आहे. या सत्राचे उद्घाटन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते आज झाले, त्यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आयुक्त शेखर सिंह बोलत होते.

यावेळी लखनऊ महानगरपालिकेचे आयुक्त गौरव कुमार, कानपूर महानगरपालिकेचे आयुक्त सुधीर कुमार, अयोध्या महानगरपालिकेचे आयुक्त जयेंद्र कुमार, सहारनपूर महानगरपालिकेचे आयुक्त सिपू गिरी, उत्तर प्रदेश शहरी रस्ते विकास विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद कुमार श्रीवास्तव, नाशिक महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे मुख्य अभियंता संजय कुलकर्णी, प्रमोद ओंभासे, सह शहर अभियंता बापूसाहेब गायकवाड, उप आयुक्त अण्णा बोदडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, सहाय्यक आयुक्त उमेश ढाकणे, कार्यकारी अभियंता सुनील पवार, अभिमान भोसले, माहिती व तंत्रज्ञान अधिकारी सुधीर बोरुडे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह विविध महानगरपालिकांचे अधिकारी व अभियंते उपस्थित होते.

आयुक्त शेखर सिंह म्हणाले, रस्त्यांचे नियोजन करताना अनेकदा वाहतूक कोंडी, वाहनांच्या सोयी यावरच लक्ष केंद्रित केल जाते. मात्र, रस्ते केवळ कार व दुचाकींसाठी नसतात. रस्त्यांवर पादचारी, सायकलस्वार, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, दिव्यांग असे अनेक घटक असतात. या सर्व घटकांसाठी रस्ते सुरक्षित असणे हे आपल्या शहराच्या विकासातील मूल्यमापनाचे लक्षण आहे. म्हणूनच सर्व रस्त्यांना समान न्याय मिळणे गरजेचे आहे.

फुटपाथ बांधणे किंवा रस्ते रुंद करणे हा फक्त एक भाग आहे. प्रत्यक्षात ‘अर्बन स्ट्रीटस्केप’ आणि ‘हरित सेतू’ सारखे उपक्रम हे शहरातील सार्वजनिक जागा अधिक आनंददायी, सक्रिय आणि सर्वसमावेशक बनवण्यासाठी महत्त्वाचे आहेत. रस्त्यांवरील जागा चालणाऱ्यांसाठी, खेळणाऱ्या मुलांसाठी, सायकल चालवणाऱ्यांसाठी अशा प्रत्येकासाठी असायला हवी. या सौंदर्यीकरणासाठी नव्हे तर सर्वसमावेशकतेसाठी केलेल्या उपाययोजना आहेत, असेही आयुक्त सिंह यावेळी म्हणाले.

शहरात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी महापालिकांनी नवे पर्याय शोधायला हवेत. ग्रीन बॉण्ड हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेने देशातील पहिला ग्रीन बॉण्ड उभारून २०० कोटी रुपये निधी उभारला असून, तो प्राधिकरण परिसरातील हरित सेतू प्रकल्पासाठी वापरण्यात येणार आहे. याशिवाय कमी उत्सर्जन क्षेत्र सारख्या संकल्पनाही हळूहळू प्रत्यक्षात आणल्या जात आहे. रस्त्यांकडे केवळ बांधकामाच्या दृष्टिकोनातून न पाहता, त्या जागा लोकांसाठी, पर्यावरणासाठी, आणि शहराच्या भविष्यकालीन आरोग्यासाठी कशा उपयुक्त होतील याचा विचार करणे ही काळाची गरज आहे, असे मत देखील आयुक्त शेखर सिंह यांनी यावेळी व्यक्त केले.

यावेळी महापालिकेच्या विविध प्रकल्पांची माहिती संगणकीय सादरीकरणाद्वारे उपस्थितांना देण्यात आली. त्यामध्ये वास्तुविशारद प्रसन्न देसाई यांनी हरित सेतू, आयटीडीपीचे प्रांजल कुलकर्णी यांनी अर्बन स्ट्रीट स्केप, कनन विजय यांनी इंटग्रेटेड कमांड कंट्रोल सेंटर, प्रतापसिंह भोसले यांनी रस्ते वाहतूक नियोजन, सर्वसमावेशक रस्ते रचना आणि विकास ठाकर यांनी बांधकाम नियोजन या विषयांवर आधारित प्रकल्पांची माहिती संगणकीय सादरीकरणाद्वारे दिली.

पिंपरी चिंचवड शहरतील विविध प्रकल्पांना अधिकारी वर्गाने दिल्या भेटी…!
रस्ते रचना व एनएमटी प्रकल्पांसाठी तांत्रिक अनुभव व, विनिमय व अभ्यास दौऱ्यासाठी देशातील विविध महानगरपालिकांच्या अधिकाऱ्यांनी शहरातील विविध विकास कामांची पाहणी केली. यावेळी मुंबई पुणे महामार्गावर वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजना, पीसीसीओई पाटील रस्ता, हरित सेतू अंतर्गत प्रायोगिक तत्वावार सुरूअसलेले काम, आकुर्डी येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृह, पुनावळे चौक, सांगवी येथील रक्षक चौक, साई चौक, पिंपळे सौदागर येथील लिनिअर उद्यान या ठिकाणी भेटी दिल्या. पिंपरी चिंचवड शहरात सुरु असलेल्या तसेच शहरात सुयोग्य नियोजन करून उभारण्यात आलेल्या प्रकल्पाची माहिती अधिकारी वर्गाने यावेळी घेतली.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!