शबनम न्यूज | प्रतिनिधी
हिंजवडी आयटी पार्ककडे जाणाऱ्या प्रमुख प्रवेशद्वारांपैकी एक असलेल्या वाकड परिसरातील रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था नागरिकांच्या आणि आयटी अभियंता वर्गाच्या दैनंदिन जीवनात अडथळा ठरत आहे. भुजबळ चौक, भूमकर चौक, ताथवडे,पुनावळे या भागांतील रस्त्यांवर तसेच महामार्गालगतच्या सेवा रस्त्यांवरही मोठ्या प्रमाणावर खड्डे निर्माण झाले असून, त्यामुळे वाहतुकीस अडथळा येत असून अपघातांचाही धोका वाढला आहे.
या भागातून दररोज हजारो वाहनचालक, आयटी अभियंते स्थानिक नागरिक प्रवास करतात. पण रस्त्यांची ही अवस्था पाहता थोड्या अंतराचा प्रवास करण्यासाठीही नागरिकांना तासन् तास वाहतूक कोंडीत अडकावे लागत आहे. परिणामी, नागरिकांचा अमूल्य वेळ आणि मानसिक स्वास्थ्याचे गंभीर नुकसान होत आहे.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे युवा नेते विशाल वाकडकर यांनी महापालिका प्रशासनाचे तात्काळ लक्ष वेधून घेतले असून, एन एच ए आय आणि महानगरपालिका यांनी संयुक्तपणे आपापल्या कार्यक्षेत्रातील रस्त्यांची युद्धपातळीवर डागडुजी आणि दुरुस्ती करावी तसेच वाहतूक कोंडीचा कायमस्वरूपी उपाय शोधावा, अशी मागणी केली आहे.
विशाल वाकडकर म्हणाले, “हिंजवडी हे देशातील एक महत्वाचे आयटी हब आहे आणि वाकड हे त्याचे प्रवेशद्वार. परंतु येथील रस्त्यांची अवस्था पाहता कोणत्याही सन्मानित शहरास लाजवणारी आहे. या समस्यांकडे दुर्लक्ष करणे म्हणजे सामान्य जनतेच्या आणि आयटी यशस्वीतेच्या विरोधात जाणे होय.”
रस्त्यांची दर्जेदार कामे, सायंकाळी आणि सकाळच्या वेळेतील वाहतूक नियोजन, सिग्नल सुधारणा, आणि अंडरपासमधील जलनिकासी व्यवस्था यावर तातडीने काम होणे गरजेचे आहे, असेही त्यांनी सांगितले.
या परिसरातील रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत स्थानिक नागरिक, सोसायट्या, वाहतूक पोलीस आणि संबंधित विभागांनी एकत्र येऊन ठोस कृती आराखडा तयार करावा, अशी विनंतीही त्यांनी केली.