शबनम न्यूज | प्रतिनिधी
“पोलीस सामाजिक स्वास्थ्य चांगले राहण्यासाठी, तर डॉक्टर माणसाचे शारीरिक स्वास्थ्य आरोग्यदायी ठेवण्यासाठी मेहनत घेत असतात. मात्र, अनेकदा पोलीस व डॉक्टरांना समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागते. या दोन्ही घटकांचा योग्य सन्मान राखला, त्यांना प्रोत्साहन मिळाले, तर समाजाचे स्वास्थ्य अधिक सुदृढ होईल.” असे प्रतिपादन माजी पोलीस सहायक आयुक्त भानुप्रताप बर्गे यांनी केले. डॉक्टर रुग्णांना लुटत नाहीत, तर त्यांना बरे करण्याला प्राधान्य देतात. त्यामुळे त्यांच्या बाबतीत असलेले गैरसमज दूर होण्याची गरज आहे, असे मत डॉ. अविनाश भोंडवे यांनी व्यक्त केले.
जागतिक डॉक्टर्स दिनानिमित्त रुग्ण हक्क परिषदेच्या वतीने आयोजित कर्तृत्ववान डॉक्टरांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते. पत्रकार भवनात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रुग्ण हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष उमेश चव्हाण होते. डॉ. योगेश लाड, डॉ. अजित केळकर, डॉ. योगेश पांगारकर, डॉ. मुकुंद संगमनेरकर, डॉ. नयना खिलारे-सोनवणे, डॉ. कीर्ती भाटी, डॉ. माया गोखले, डॉ. मनिष पाटील, डॉ. अशोक घोणे, डॉ. भीम गायकवाड, डॉ. राहुल मोरे, डॉ. रोहित बोरकर, डॉ. विशाल हेन्ड, डॉ. नित्यानंद ठाकूर, डॉ. सुरेश माळी,डॉ. अरुण देवकाते, डॉ. श्रीकांत मुंदडा, डॉ. अनंत बागुल, डॉ. अपर्णा सोले यांचा सत्कार करण्यात आला.
प्रसंगी माजी सहायक पोलीस आयुक्त मिलिंद गायकवाड व जानमहंमद पठाण, इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे, पुणे महानगरपालिकेतील सहायक आरोग्य अधिकारी डॉ. सूर्यकांत देवकर, अष्टांग आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भीम गायकवाड, संयोजिका अपर्णा मारणे-साठ्ये, कार्यकर्ते प्रभा अवलेलू, चित्रा साळवे, रेखा वाघमारे, सुरेश फाले, अशोक भोसले, रेश्मा जांभळे, यशवंत भोसले आदी उपस्थित होते.
भानुप्रताप बर्गे म्हणाले, “नकारात्मकता दाखवण्यात भारतीय लोक अग्रेसर आहेत. पोलीस आणि डॉक्टरांच्या बाबतीत समाजाचा दृष्टीकोन तितकासा चांगला नाही. त्यामुळे या दोन्ही घटकांनी आपले कर्तव्य बजावताना नीतिमत्तेची कास सोडता कामा नये. समाजाचे स्वास्थ्य राखणाऱ्यांचा सन्मान करणे ही आजच्या काळात चांगली गोष्ट आहे. रुग्ण हक्क परिषदेने नेहमीच समाज व डॉक्टरांमधील नातेसंबंध दृढ करण्याला प्राधान्य दिले आहे.”
डॉ. अविनाश भोंडवे म्हणाले, “डॉक्टर हा केवळ पेशा नाही, ती एक सेवा, एक जबाबदारी आणि समाजाशी असलेली एक नितांत नाळ आहे. माणुसकीने केलेली सेवा या व्यवसायाचे मोल वाढवते. कोविड काळात डॉक्टरांनी जीव धोक्यात घालून बजावलेले कर्तव्य समाज कधीही विसरणार नाही. डॉक्टरांनाही काही हक्क आहेत, त्याची जपणूक व्हावी. समाजाकडून डॉक्टरांचा उचित सन्मान राखला जावा.”
अध्यक्षीय भाषणात उमेश चव्हाण म्हणाले, “सध्याच्या काळात भारतीय समाज नकारात्मक विचार, तिरस्काराची भावना या स्थितीतून जात आहे. अशावेळी आपण एकमेकांना आशावादी राहण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे. समाजात वाईट प्रवृत्ती आहेत, तसे चांगले लोक आहेत. प्रामाणिकपणे त्यांची सेवा, कर्तव्य बजावत आहेत. पोलीस समाजाचे, तर डॉक्टर शारीरिक आरोग्याचे संरक्षण करतात. त्यांचा सन्मान ऊर्जादायी असतो.”
मिलिंद गायकवाड, डॉ. भीम गायकवाड, डॉ. श्रीकांत मुंदडा, डॉ. सुरेश माळी यांनीही मनोगते व्यक्त केली. राजाभाऊ कदम, अपर्णा मारणे-साठ्ये यांनी स्वागत प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन डॉ. योगेश कदम यांनी केले. जानमहमंद पठाण यांनी आभार मानले.