शबनम न्यूज | प्रतिनिधी
राज्यभरातील विधी शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी मुंबईतील दर्द से हमदर्द तक संस्था आणि पिंपरी येथील एस एन बी पी विधी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १२ आणि १३ जुलै २०२५ रोजी एस एन बी पी विधी महाविद्यालय, मोरवाडी, पिंपरी येथे राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी ‘कॉलेजियम सिस्टम – शाप की वरदान?’ हा विषय असून प्रथम पारितोषिक तीस हजार रुपये, द्वितीय पारितोषिक वीस हजार रुपये तसेच उत्कृष्ट वक्ता आणि उत्कृष्ट प्रतिवादी यांना प्रत्येकी पाच हजार रुपयांची पारितोषिके तसेच विजेत्या स्पर्धकांना सन्मानचिन्ह प्रदान करण्यात येणार असून स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल. विषयाची मांडणी करण्यासाठी मराठी, हिंदी किंवा इंग्लिश यापैकी कोणत्याही भाषेची निवड स्पर्धक करू शकतील, कॉलेजियम सिस्टम देशातील उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती नियुक्तीची महत्त्वाची पद्धत आहे.
जगात सर्वोत्तम मानली जाणारी ही पद्धत चांगली की वाईट याबाबतीत देशात अजूनही चर्चा होत आहे. सन २०१५ या वर्षात सर्वोच्च न्यायालयाने न्यायाधीश नियुक्तीसाठी कॉलेजियम सिस्टमच योग्य असल्याचा निवाडा देत नॅशनल ज्युडिशिअल अपॅाईनमेंटस् कमिशन ॲक्ट रद्दबातल ठरवला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर विधी शाखेतील विद्यार्थ्यांची वेगवेगळी मते आहेत. त्याबाबतीत विचार मांडण्यासाठी राज्यस्तरीय व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या हेतूने वादविवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती दर्द से हमदर्द तक संस्थेचे ॲड. प्रकाश साळशिंगीकर आणि एस एन बी पी संस्थेचे संस्थापक सचिव डाॅ. डी. के. भोसले यांनी दिली. महाराष्ट्र व गोवा राज्यातील विधी महाविद्यालये व विधी शाखेचे विद्यार्थी यांचा सदरहू स्पर्धेसाठी भरघोस प्रतिसाद मिळत असून स्पर्धेत सहभाग नोंदणीची अंतिम तारीख ०७ जुलै २०२५ आहे, अशी माहिती दर्द से हमदर्द तक संस्थेचे ॲड. सतिश गोरडे यांनी दिली आहे.