शबनम न्यूज | प्रतिनिधी
किल्ले रायरेश्वर (ता. वाई) कडे जाणाऱ्या रस्त्यावर वाईपासून सात किमी अंतरावर आसरे (ता. वाई) गावच्या हद्दीत, पिंपरी चिंचवड, पुणे येथील एका पर्यटकाचा हृदयविकाराने मृत्यू झाला.
मयूर चंद्रकांत चौधरी (वय ४२, सिग्नेचर पार्क, डांगे चौक, पिंपरी चिंचवड, पुणे) असे मृत्यू झालेल्या पर्यटकाचे नाव आहे. याबाबत वाई पोलीस ठाण्यात दीपक दशरथ बर्गे, काळेवाडी, पिंपरी, पुणे, यांनी खबर दिली आहे. त्यानुसार पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे.
मयूर चौधरी मित्रांसोबत पर्यटनासाठी वाईच्या पश्चिम भागात आले होते. तेथून किल्ले रायरेश्वरला जात असताना आसरे (ता. वाई) गावच्या हद्दीत मयूर चौधरी यांना छातीमध्ये दुखू लागले व घाम येऊ लागला. त्यांना उपचाराकरिता वाई येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.