शबनम न्यूज | प्रतिनिधी
भारतीय अवकाश संशोधन संस्थेतील (इस्रो) माजी वरिष्ठ शास्त्रज्ञ विजय पेंडसे यांचे दीर्घ आजाराने सोमवारी अमेरिकेत निधन झाले. ते ८० वर्षांचे होते. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा, मुलगी आणि नातवंडे असा परिवार आहे.
पेंडसे यांनी पुणे विद्यापीठातून रसायनशास्त्राचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर ते पाषाण येथील शस्त्र संशोधन आणि विकास संस्था (एआरडीई) येथे कनिष्ठ शास्त्रज्ञ म्हणून काम करत होते. त्याच दरम्यान भारताचे रॉकेट मॅन, माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी पेंडसे यांची निवड थुंबा विषुवृत्तीय अग्निबाण प्रक्षेपण केंद्रावर साहाय्यक शास्त्रज्ञ म्हणून केली.
भारताच्या एसएलव्ही ३ आणि पीएसएलव्ही प्रक्षेपणात घन इंधनाचा वापर केला गेला. १९९५ मध्ये अंतर्गत राजकारणाला कंटाळून त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. ते इस्रोतून बाहेर पडले. कालांतराने ते अमेरिकेतील मिशिगन येथे एका रासायनिक कंपनीत रसायन विभाग प्रमुख म्हणून कार्यरत होते.