शबनम न्यूज | प्रतिनिधी
सावकारी त्रासामुळे एकाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीस आला. २५ ते २६ जून दरम्यान नाणेकरवाडी येथे ही घटना घडली.
संतोष हरिभाऊ नाणेकर असे आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी त्यांच्या पत्नीने चाकण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. विकास ऊर्फ बाली अशोक परदेशी (रा. चाकण), अतुल मोहन रिठे (रा. ठाकूर पिंपरी) व त्यांचे दोन साथीदार अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. पोलिसांनी संशयित विकास आणि अतुल या दोघांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष यांनी संशयितांकडून व्याजाने पैसे घेतले होते. घेतलेल्या पैशांपेक्षा चौपट अधिक पैसे त्यांनी संशयितांना दिले होते. संशयितांनी संतोष यांच्याकडून कोरे धनादेशदेखील घेतले होते. चौपट अधिक पैसे घेऊनदेखील संशयितांनी आणखी पैशांची मागणी केली. या त्रासाला कंटाळून संतोष यांनी घरात गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.