spot_img
spot_img
spot_img

‘जगात आई आणि बाप ही दोनच दैवते!’ – कवी अनिल दीक्षित

शबनम न्यूज | प्रतिनिधी

‘जगात आई आणि बाप ही फक्त दोनच दैवते आहेत!’ असे विचार सुप्रसिद्ध कवी अनिल दीक्षित यांनी कोकाटे हाॅस्पिटलसमोर, रामनगर, पिंपळेगुरव येथे शुक्रवार, दिनांक २७ जून २०२५ रोजी व्यक्त केले. महाकवी कालिदासदिनानिमित्त शब्दधन काव्यमंच आयोजित ‘आई – बाप’ कविसंमेलनात प्रमुख पाहुणे म्हणून अनिल दीक्षित बोलत होते. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि श्री साई नेत्रसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक प्रदीप गायकवाड अध्यक्षस्थानी होते. सामाजिक कार्यकर्ते गौतम डोळस, उदय ववले यांची प्रमुख उपस्थिती होती.

अनिल दीक्षित पुढे म्हणाले की, ‘ज्यांच्याकडे काहीही मागायला नवस करावा लागत नाही, अशी आई – बाप ही जगातील फक्त दोनच दैवते आहेत. जेव्हा सगळे जग आपल्या विरोधात जाते, तेव्हा मायबापच खंबीरपणे आपल्या पाठीशी असतात. आई कवितेसारखी तर वडील हे कादंबरीप्रमाणे असतात!’ दीक्षित यांनी ‘आषाढ’ ही कविता सादर केली. प्रदीप गायकवाड यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून, ‘लोकांच्या मनातील भावना आपल्या शब्दांतून व्यक्त करण्याचे खूप मोठे वरदान कवींना मिळालेले असते. बापाची माया अमाप असते!’ असे मत मांडले.

आई – बाप या वैशिष्ट्यपूर्ण कविसंमेलनात शिवाजी शिर्के, तानाजी एकोंडे, सुहास सतर्के, आय. के. शेख, शामराव सरकाळे, बाळकृष्ण अमृतकर, जयश्री गुमास्ते, अरुण परदेशी यांनी आई आणि बाप या विषयावरील भावपूर्ण कवितांचे सादरीकरण केले. कविसंमेलनादरम्यान अधूनमधून आलेल्या पावसाच्या रेशीमधारांनी तसेच लष्कराच्या भिंतीवर आई-वडिलांची काढलेली सुबक चित्रे यामुळे आई – बाप कविसंमेलनाला अधिकच रंगत आली. स्मिता सतर्के, अविनाश तांबे, परशुराम थोरात, सुभाष गुजराथी, मारुती नलावडे, धर्माजी कुंभार, रुक्मिणी कोरे, भागीरथी सरोदे, तात्याबा घनवट, रुद्रांश थोरात यांनी संयोजनात सहकार्य केले. शब्दधनचे अध्यक्ष सुरेश कंक यांनी सूत्रसंचालन केले. मुरलीधर दळवी यांनी आभार मानले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!