सोन्याने आठवड्याच्या प्रारंभीच मोठी उसळी घेतल्याने, दर ९२ हजारांच्या उंबरठ्यावर पोहोचले आहेत. सोने दराने आतापर्यंतचा सर्वकालीन उच्चांक गाठला असून, एक लाखाच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. आगामी दसरा, दिवाळीपर्यंत सोने लाखाचा टप्पा पार करेल, अशी शक्यता वर्तविली जात आहे. मात्र, ज्या गतीने दरवाढ होत आहे, त्यावरून दसरा, दिवाळीअगोदरच सोने लाखाच्या पार जाणार, अशी शक्यता जाणकरांकडून व्यक्त केली जात आहे.
असे आहेत दर
-
२४ कॅरेट – प्रति तोळा – ९१ हजार २५०
-
२२ कॅरेट – प्रति तोळा – ८३ हजार ९५०
-
चांदी – प्रति किलो – एक लाख तीन हजार
(सर्व दर जीएसटीसह)
आंतरराष्ट्रीय स्तरावर घडणाऱ्या घडामोडींवर सोने-चांदीचे दर अवलंबून असतात. अमेरिकेत सत्ता बदल झाल्यानंतर ट्रम्प सरकारच्या धोरणामुळे दर सातत्याने वधारत आहेत. गेल्या आठवड्यात सोने दराने सर्वकालिन उच्चांक प्राप्त करीत, ९० हजारांचा आकडा पार केला होता. या आठवड्यात दर ९१ हजारांच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. दुसरीकडे चांदीतही मोठी दरवाढ दिसून येत आहे. चांदीने यापूर्वीच एक लाखांचा टप्पा पार केला आहे. आता चांदी एक लाख दहा हजार दराच्या दिशेने वाटचाल करीत आहे. गुरुवारी चांदीचा दर एक लाख तीन हजार रुपये प्रति किलो इतका नोंदविला गेला. दरम्यान, पुढील महिन्यात लग्नसराई सुरू होणार असून, वाढत्या दरांमुळे यजमानांमध्ये काहीसे चिंतेचे वातावरण बघावयास मिळत आहे. तर दुसरीकडे गुंतवणूकदार याकडे संधी म्हणून बघत असल्याचे सराफ व्यावसायिकांचे म्हणणे आहे.