शबनम न्यूज | प्रतिनिधी
सासूकडून हुंड्यासाठी होणाऱ्या छळामुळे उच्चशिक्षित महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना हडपसर परिसरातील हांडेवाडी भागात घडली. याप्रकरणी सासूविरुद्ध काळेपडळ पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दीपिका प्रमोद जाधव (वय २९) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत दीपिकाच्या वडिलांनी काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी सासू द्वारका नामदेव जाधव (रा. सातवनगर, हांडेवाडी रस्ता) हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपिका आणि प्रमोद जाधव यांचा आठ वर्षांपूर्वी विवाह झाला होता. दीपिकाने कृषीविषयक पदवी मिळवली आहे. विवाहानंतर ती एका खासगी कंपनीत नोकरी करत होती. तिचा पती शासकीय कार्यालयात लिपिक आहे. त्यांना एक मुलगा आहे.विवाहानंतर सासू द्वारका हिने दीपिकाला हुंड्यासाठी त्रास देण्यास सुरूवात केली. विवाहात हुंडा कमी दिल्याचे सांगून तिला टोमणे मारण्यात आले. तिचा शारिरिक आणि मानसिक छळ केला. तिच्याकडे पैशांची मागणी करण्यात आली. छळ असह्य झाल्यने दीपिकाने शुक्रवारी (२० जून ) राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली, असे तिच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.