शबनम न्यूज | प्रतिनिधी
पालखी २०२५ दरम्यान आषाढी वारीमध्ये सहभागी होणाऱ्या लाखो भाविकांना स्वच्छ व सुरक्षित सुविधा मिळाव्यात यासाठी जिल्हा परिषद, पुणे यांच्या वतीने यंदा विशेष इ ‘टॉयलेट सेवा’ नावाचे मोबाईल ॲपची निर्मिती करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेला हा उपक्रम स्वच्छतेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल मानला जात आहे.
वारी मार्गावर विविध ठिकाणी फिरते शौचालय उपलब्ध करून देण्यात आली असून, त्यांची संख्या पुढीलप्रमाणे आहे, श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग १८०० शौचालये, श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्ग १२०० शौचालये, श्री संत सोपान महाराज पालखी मार्ग ३०० शौचालये उभारण्यात आली आहे.
या शौचालयांच्या व्यवस्थापनासाठी विशेष मोबाईल ॲप तयार करण्यात आले असून, या ॲपमध्ये शौचालयाची उभारणी व स्थिती, स्वच्छतेची माहिती व नियमित वापर, शौचालयाच्या ठिकाणी असलेली पाणी, वीज, रस्ता व साफसफाईची माहिती, शौचालयाचा वापर किती झाला याचा तपशील, नागरिकांनी त्यांच्या प्रतिक्रिया व सूचना नोंदवण्याची सुविधा सेवा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
प्रत्येक शौचालयावर क्युआर कोड स्कॅनर लावण्यात आले असून गुगल स्कॅनर वापरून हा क्युआर कोड स्कॅन केल्यास संबंधित शौचालयाची माहिती मोबाईलवर तात्काळ मिळू शकते. ॲप गुगल प्ले स्टोअर वर उपलब्ध असून, भाविकांनी या ॲपचा वापर करून सुविधा व स्वच्छतेबाबत आपली मते नोंदवावीत, असे आवाहन जिल्हा परिषद प्रशासनाने केले आहे.
जिल्हा परिषदेचा हा उपक्रम आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर करत वारकऱ्यांच्या सेवेत एक महत्त्वाची भर घालणार आहे. मोबाईल करिता खालील प्रमाणे लिंक उपलब्ध करुन दिलेल्या आहेत.
Android मोबाईल करिता लिंक https://play.google.com/store/apps/details?id=com.palsak
ॲपल मोबाईल करिता लिंक https://apps.apple.com/in/app/toiletseva/id1557438957
वरिल लिंक वापरुन नागरिकांनी मोबाईल ॲपचा वापर करावा, असे जिल्हा परिषद प्रशासनातर्फे आवाहन करण्यात आलेले आहे.