शबनम न्यूज | प्रतिनिधी
आषाढी वारीसाठी जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे आज बुधवारी (१८ जून) तर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे उद्या गुरुवारी (१९ जून) पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. पालखी सोहळ्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून देहू, आळंदीत हजारो वारकरी दाखल झाले असून, सर्वत्र भक्तिमय वातावरण आहे.
ज्ञानोबा-तुकोबांच्या पालख्यांसमवेत पंढरीच्या वाटेवर चालण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यांतून वारकऱ्यांच्या दिंड्या आळंदी आणि देहूमध्ये दाखल झाल्या आहेत. आळंदी-देहूच्या दिशेने येणाऱ्या रस्त्यांवर खांद्यावर भागवत धर्माच्या पताका घेतलेले वारकरी आणि डोईवर वृंदावन घेऊन निघालेल्या महिला दिसून येत आहेत.
पालखीच्या प्रस्थान सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने दाखल होत असलेल्या वारकरी आणि भाविकांच्या सुविधेसाठी प्रशासनाकडूनही सज्जता ठेवण्यात आली आहे. पोलिसांकडून बंदोबस्तात वाढ करण्यात आली असून, देवस्थानच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांची तयारी केली जात आहे. तुकोबांच्या पालखीचे १८ जूनला देहूतून प्रस्थान झाल्यानंतर त्या दिवशी पालखी देहूतच इनामदार वाड्यात मुक्कामी राहणार आहे. १९ जूनला माउलींची पालखी आळंदीतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे.