शबनम न्यूज | प्रतिनिधी
आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्यासाठी आज शरद पवार यांनी पिंपरी- चिंचवड मध्ये मेळावा घेतला. पुन्हा पक्षाचा झेंडा खांद्यावर घेऊन तयारीला लागा, असं आवाहन यावेळी शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे. निवडणुकीची तुम्ही काळजी करू नका. आपण सगळ्या जागा लढवू, आपल्या सोबत जो कोणी, महिला, तरुण येत असेल त्यांचं स्वागत आहे. आपण त्यांना संधी देऊ, असं देखील यावेळी शरद पवार यांनी म्हटल आहे. शरद पवार हे पिंपरी -चिंचवड मध्ये संकल्प मेळाव्यामध्ये बोलत होते.
पिंपरी- चिंचवड शहरात सत्ताधाऱ्यांनी वाटण्या केल्या आहेत. इथला कारभार स्वच्छ करण्यासाठी नागरिकांनी आगामी महानगरपालिकेत संघटनात्मक काम करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच नेतृत्व निवडून देण्यात यावं असं आवाहन देखील त्यांनी केलं आहे. गेलेल्यांची चिंता करू नका. आपल्याला नवीन नेतृत्वाची फळी निर्माण करायची आहे. असं ही शरद पवार म्हणाले.
ते म्हणाले, भाषण करताना कुणी तरी सांगितले की तुम्ही सगळ्यांना बरोबर घ्या. सगळ्यांना बरोबर घ्यायला काही चिंता करायचे कारण नाही. पण सगळे म्हणजे कोण?. गांधी- नेहरू चव्हाण यांचा विचार, फुले शाहू आंबेडकर यांचा विचार आणि हे सगळे असतील तर मला मान्य आहे. पण सत्तेच्यासाठी भाजप बरोबर जाऊन बसायचे ही भूमिका कुणी मांडत असेल हा विचार काँग्रेसचा विचार नाही.त्यामुळे कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी संबंध हा काँग्रेसच्या विचारात असू शकत नाही. त्यामुळे अशा पद्धतीने संधी साधूपणाचे राजकारण आपल्याला प्रोत्साहित करायचे नाही. त्या दृष्टिकोनातून पावले आपल्याला टाकायची आहेत, असं शरद पवार यांनी स्पष्ट करत भाजप बरोबर जाणार नसल्याचे स्पष्ट केले.