spot_img
spot_img
spot_img

मावळातील शाळेची जिल्हास्तरीय यशस्वी कामगिरी – पिंपळखुटे शाळेला तृतीय क्रमांकाचा सन्मान

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पुणे जिल्हा परिषदेतर्फे साकारलेल्या “पुणे मॉडेल स्कूल” आणि “स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र (PHC)” या अभिनव उपक्रमांच्या उद्घाटन समारंभात मावळ तालुक्याचा अभिमान वाढवणारी घटना घडली. पिंपळखुटे (ता. मावळ) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावून जिल्हास्तरीय यश मिळवले.

या सन्मानाने मावळातील शैक्षणिक क्षेत्रात होत असलेल्या सकारात्मक बदलांचे दर्शन घडले असून, ग्रामीण भागातील शाळाही गुणवत्ता, उपक्रमशीलता आणि स्पर्धात्मकतेच्या बाबतीत पुढे आहेत, हे अधोरेखित झाले.

या भव्य कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, विधान परिषदेच्या उपाध्यक्ष डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, मावळचे आमदार सुनील शेळके, विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवाड, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली होती.

याच कार्यक्रमात ह्युंदाई इंडिया प्रा. लि. यांच्या वतीने मावळ तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी देण्यात आलेल्या दोन रुग्णवाहिकांचे लोकार्पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील आरोग्यसेवेला प्रत्यक्ष बळ मिळणार आहे.

कार्यक्रमात जिल्हाभरातील गुणवंत शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. त्यामध्ये मावळातील रंजना वाघ (धामणे), सुजाता ताराळकर (उर्से) आणि वैशाली मिसाळ (पुसाणे) यांचा समावेश होता.

पुणे मॉडेल स्कूल ही आधुनिक, समावेशी आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणव्यवस्थेची नवी दिशा दर्शवणारी संकल्पना आहे. स्मार्ट क्लासरूम्स, प्रगत विज्ञान प्रयोगशाळा, समृद्ध ग्रंथालय, करिअर मार्गदर्शन, विद्यार्थिनींसाठी विशेष उपक्रम यांसारखी वैशिष्ट्ये या शाळेचे प्रमुख घटक असणार आहेत.

स्मार्ट मॉडेल पीएचसी मध्ये IPHS मानांकनानुसार दर्जेदार आरोग्य सेवा, HIMS प्रणाली, सौरऊर्जेवर चालणारे हरित आरोग्य केंद्र आणि आधुनिक वैद्यकीय सुविधा यांचा समावेश असून, ग्रामीण आरोग्य व्यवस्थेत नवे मापदंड निर्माण करण्याची क्षमता या केंद्रात आहे.

शिक्षण व आरोग्याच्या क्षेत्रात ग्रामीण भागात घडणारा हा समन्वित विकास ‘पुणे मॉडेल’च्या माध्यमातून उभारला जात असून, ही संकल्पना संपूर्ण राज्यासाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास कार्यक्रमात व्यक्त करण्यात आला.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!