शबनम न्यूज | प्रतिनिधी
जागतिक आरोग्य संघटनेद्वारे 2004 पासून दरवर्षी प्रसिद्ध वैद्यकशास्त्रज्ञ, नोबेल पारितोषिक विजेते डॉ. कार्ल लँडस्टिनर यांचा जन्मदिवस म्हणजेच 14 जून जागतिक रक्तदाता दिन म्हणून साजरा केला जातो. याच दिवसाच्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड मनपाच्या वाय.सी.एम. हॉस्पिटल रक्तकेंद्राने शहरातील विविध ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. यावर्षीच्या “रक्त देऊया, आशा जागवूया : एकत्रितपणे जीव वाचवूया !” या संकल्पनेवर आधारित जागतिक रक्तदाता दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रम प्रसंगी पिंपरी चिंचवड मनपाचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे वाय.सी.एम. हॉस्पिटल विभाग प्रमुख तथा अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवार, वाय.सी.एम हॉस्पिटल रक्तकेंद्राचे रक्त संक्रमण अधिकारी डॉ. नीता घाडगे, चिंचवड देवस्थान ट्रस्टचे श्री. घोडके रक्ताचे नाते ट्रस्टचे श्री. सुहास हिंगणे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या रक्तदान शिबिर अंतर्गत आलेल्या सर्व रक्तदात्यांचा पुष्प व सन्मानपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. तसेच उपस्थित सर्व रक्तदात्यांना व आयोजकांना राज्य रक्त संक्रमण परिषद यांनी ‘जागतिक रक्तदाता दिनानिमित्त’ सूचनेच्या नियमावलीनुसार ऐच्छिक रक्तदाता शपथेचे वाचन करण्यात आले.
प्रसंगी कार्यक्रमातील प्रमुख अतिथी पिंपरी चिंचवड मनपाचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी उपस्थित रक्तदाते व रक्तदान शिबिर आयोजकांना त्याचप्रमाणे विविध मंडळे, संस्था, ट्रस्ट, महाविद्यालये आणि औद्योगिक वसाहती यांना रक्तदान शिबिरे आयोजित करून वाय.सी.एम. हॉस्पिटल रक्तकेंद्राला संधी द्यावी आणि युवकांनी नियमित रक्तदान करण्याचे आवाहन केले. त्याच प्रमाणे रक्तदानाचे महत्त्व, जाणीवजागृती आणि लोकांमध्ये असणारे गैरसमज याबद्दल मोलाचे मार्गदर्शन केले. आजच्या रक्तदान शिबिरात एकूण 58 रक्तदात्यांनी रक्त रक्तदानामध्ये सहभाग नोंदवला. रक्तदाता शपथेचे वाचन वरिष्ठ रक्ततंत्रज्ञ श्री. गिरीजात्मक जोशी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाय.सी.एम. हॉस्पिटलचे समाजसेवा अधीक्षक श्री. किशन गायकवाड यांनी तर आभार प्रदर्शन समुपदेशक श्री. सुनीत आवटे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चिंचवड देवस्थान ट्रस्ट चिंचवडगाव, रक्ताचे नाते ट्रस्ट-महाराष्ट्र राज्य आणि रक्तकेंद्राचे रक्त संक्रमण अधिकारी डॉ.गणेश लांडे, श्रीम. उर्मिला हजारे तसेच रक्तकेंद्रातील उपस्थित सर्व अधिकारी, कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.