spot_img
spot_img
spot_img

इलेक्ट्रीकल वाहनांचे गैरसमज दूर होण्याची गरज – सिताराम कंदी

  • ‘एमआयटी एडीटी’त ‘इ-मोबिलिटी’ उत्कृष्टता केंद्राचे उद्घाटन 

शबनम न्यूज | प्रतिनिधी

इलेक्ट्रीकल वाहने भारतासह जगाचे भविष्य आहेत. परंतू, अद्यापही काही गैरसमज असल्याने लोक अपेक्षितरित्या इलेक्ट्रीकल वाहनांची खरेदी करत नाहीत. इलेक्ट्रीक चारचाकी वाहनांना चालविण्यासाठीचा खर्च इतर इंधनांपेक्षा अतिशय अल्प आहे. केवळ या वाहनांबद्दल आणि त्यांच्या बॅटरी आयुष्याबद्दलचे गैरसमज दूर करण्याची गरज असून ते केल्यास भारतात इलेक्ट्रीक वाहनांची विक्रमी विक्री होईल, असे मत टाटा मोटर्सचे मुख्य मानव संसाधन अधिकारी सिताराम कंदी यांनी व्यक्त केले.


एमआयटी आर्ट, डिजाईन व टेक्नाॅलाॅजी विद्यापीठ, पुणे येथे यांत्रिक विभाग व इम्पीरियल सोसायटी ऑफ इनोव्हेटिव्ह इंजिनिअर्स (आयएसआयई) प्रा. लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने ‘इ-मोबिलिटी’मधील उत्कृष्टता केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी, एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या कार्यकारी संचालक प्रा.डाॅ.सुनिता कराड, अवजड उद्योग मंत्रालयाचे उत्पादन क्षेत्राचे उपसचिव गौरव जोशी, कुलगुरू प्रा.डाॅ.राजेश एस., प्र.कुलगुरू डाॅ.रामचंद्र पुजेरी, कुलसचिव प्रा.डाॅ.महेश चोपडे, स्कूल ऑफ इंजिनिअरिंगचे संचालक डाॅ.विरेंद्र शेटे, अधिष्ठाता डाॅ.सुदर्शन सानप, यांत्रिक विभाग प्रमुख डाॅ.सचिन पवार, विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डाॅ.सुराज भोयार, इव्ही कार्यक्रम संचालक प्रा.शशांक गावडे आदी उपस्थित होते.

यावेळी कंदी पुढे म्हणाले, टाटा मोटर्स आणि एमआयटी एडीटी यांच्यात अनेक वर्षांपासून सामंजस्य करार असून त्या अन्वये एमटेक इन ईव्ही टेक्नॉलॉजीची पहिली बॅच यंदा पास होवून बाहेर पडली याचा मनस्वी आनंद आहे. एमआयटी एडीटीच्या सहकार्यामुळे इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रातील संशोधनाला चालना देण्यासाठी असंख्य विद्यार्थ्याची भागीदारी टाटा मोटर्सला मिळत आहे.

या प्रसंगी, जोशी यांनी भारत सरकार इलेक्ट्रीक वाहनांच्या वापराला चालना देण्यासाठी करत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. तसेच, एमआयटी एडीटी विद्यापीठातील हे इव्ही केंद्र सरकारचे उपक्रम तळापर्यंत पोचविण्यात व इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रातील संशोधनास वाव देण्यात अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचेही त्यांनी म्हटले.

विश्वशांती प्रार्थनेने सुरु झालेल्या या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा.स्नेहा वाघटकर यांनी केले तर यशस्वीतेसाठी समन्वयक प्रा.विजयकुमार शेफ, प्रा.सतीश पाटील प्रा.नेहा झोप यांनी मेहनत घेतली.

इलेक्ट्रिक व्हेईकल्स शाखांमध्ये प्रवेश देणारे पहिले विद्यापीठ

एमआयटी एडीटी हे भारतातील पहिले विद्यापीठ आहे जिथे बी.टेक आणि एम.टेक इलेक्ट्रिक व्हेईकल्स या शाखांमध्ये अभ्यासक्रम सुरू केले आहेत. हे विद्यापीठ सध्या देशात ई-मोबिलिटी क्षेत्रात अग्रगण्य स्थानावर असून, उद्योग व शिक्षण यामधील सेतू म्हणून कार्य करत आहे. सदर सेंटरमुळे विद्यार्थ्यांना इव्ही (इलेक्ट्रिक व्हेईकल्स), बॅटरी मॅनेजमेंट सिस्टीम, चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर आणि ग्रीन टेक्नॉलॉजीसारख्या आधुनिक क्षेत्रांमध्ये थेट प्रात्यक्षिक प्रशिक्षणाची संधी मिळणार आहे. विद्यार्थ्यांना नवकल्पना, संशोधन आणि स्टार्टअप्ससाठी उत्कृष्ट संधी उपलब्ध करून देणारे हे सेंटर, महाराष्ट्र आणि देशाच्या आर्थिक व पर्यावरणीय विकासात मोलाचे योगदान देईल, असा विश्वास यावेळी बोलताना प्रा.डाॅ.सुनिता कराड यांनी व्यक्त केला.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!