spot_img
spot_img
spot_img

जपानचे महावाणिज्यदूत यागी कोजी यांनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सदिच्छा भेट

शबनम न्यूज | प्रतिनिधी

भारत आणि जपान नैसर्गिक मित्र असून आध्यात्मिक, सांस्कृतिकदृष्ट्याही दोन्ही देशांचं वेगळं नातं आहे. भारताच्या औद्योगिक प्रगतीत, पायाभूत सुविधांच्या निर्मितीत जपानची भूमिका महत्वाची राहिली आहे. भारतात जपाननं मोठी औद्योगिक गुंतवणुक केली असून महाराष्ट्रात तीनशेहून अधिक तर, पुणे आणि परिसरात पन्नास कंपन्या कार्यरत आहेत. राज्याच्या औद्योगिक, आर्थिक, सामाजिक प्रगतीत, रोजगारनिर्मितीत मोलांचं योगदान देणाऱ्या या कंपन्यांच्या समस्यांचे निराकरण करुन त्यांच्यासाठी उद्योगपुरक वातावरण निर्माण करणं शासनाची जबाबदारी आहे. यापुढील काळात उद्योग, आर्थिक क्षेत्रातील सहकार्यासोबतच सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातही भारत आणि जपान यांच्यातील सहकार्य वाढविण्यासाठी प्रयत्न करुया, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जपानचे मुंबईतील वाणिज्यदूत यागी कोजी यांच्या भेटीदरम्यान आज झालेल्या चर्चेवेळी केलं.

जपानचे मुंबईतील महावाणिज्यदूत यागी कोजी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी जपानी राज्यात जपानी गुंतवणूक वाढवण्यासह, उद्योगक्षेत्रासमोरील अडचणी दूर करण्यासंदर्भात सविस्तर चर्चा झाली. उद्योग, आर्थिक क्षेत्रांबरोबरंच दोन्ही सामाजिक,सांस्कृतिक सहकार्य वाढविण्यावरही चर्चेत भर देण्यात आला. राज्याच्या नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव तथा विकास आयुक्त डॉ. राजगोपाल देवरा, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी. गुप्ता, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. राजेश देशमुख उपस्थित होते.

मुंबई, पुण्यासह राज्यात विविध ठिकाणी कार्यरत जपानी कंपन्यांना भेडसावणाऱ्या प्रश्नांना सोडविण्यास राज्य शासन प्राधान्य देईल. चांगले रस्ते, पुरेशी वीज, आवश्यक पाणी, सुरक्षित वातावरण आदी पायाभूत सुविधा पुरवण्याची जबाबदारी शासनाची आहे, ती पार पाडण्यात येईल. पुण्याच्या औद्योगिक परिसरातील रस्त्यांची दुरुस्ती करणयात येईल. सणसवाडी ते पिंपळे जगताप या रस्त्यासाठी ८० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तिथे भूसंपादनाची प्रक्रिया सुरू असून पावसाळ्यानंतर या रस्त्याचे काम सुरू होईल. जिथे तातडीने रस्तादुरुस्ती आवश्यक आहे तेथे काँक्रीटच्या रस्त्याचे काम पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने तातडीने सुरू करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत दिले.

पुण्यातील जपानी कंपन्यांना पायाभूत सुविधांबरोबरच रस्ते, वीज, पाणी दळणवळणासंदर्भातील प्रश्न तातडीने सोडवण्यात येतील. जपानी कंपन्यांच्या प्रश्नांसंदर्भात जपानी कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोवत पुण्यात बैठक आयोजित करण्यात येईल. धोरणात्मक आणि करासंदर्भातील प्रश्नही सोडवले जातील, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जपानच्या मुंबईतील महावाणिज्यदूतांना दिली. यावेळी मियावाकी उद्याने, सामाजिक उत्तरदायित्व निधी, जायका, एस.टी.पी., पूर नियंत्रण अशा विविध प्रश्नांवर उभयतांमध्ये चर्चा झाली. पुढील काळात महाराष्ट्रातील गुंतवणुकीचे वातावरण अधिक चांगले होईल आणि भारत-जपान मैत्री आणखी दृढ होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महावाणिज्यदूत यागी कोजी यांनी व्यक्त केला.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!