spot_img
spot_img
spot_img

भारतभेटीने प्रभावित झाल्याची पॅराग्वे राष्ट्राध्यक्ष सँटियागो पेना यांची भावना

शबनम न्यूज | प्रतिनिधी

तीन दिवसांच्या भारतभेटीवर आलेले पॅराग्वे प्रजासत्ताकाचे अध्यक्ष सँटियागो पेना पॅलासिओस यांचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी राज्य शासनाच्या वतीने राजभवन, मुंबई येथे स्वागत केले.

जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था म्हणून उदयास आलेल्या भारताने आगामी काळात जागतिक पटलावर महत्त्वाची भूमिका बजावावी, अशी अपेक्षा राष्ट्राध्यक्ष सँटियागो पेना यांनी यावेळी व्यक्त केली. भारत दौऱ्यात पाहिलेल्या प्रत्येक गोष्टींनी आपण प्रभावित झाल्याची भावना यावेळी अध्यक्ष पेना यांनी व्यक्त केली. दक्षिण अमेरिका खंडातील ‘अन्नधान्याचे कोठार’ म्हणून पॅराग्वे ओळखला जातो असे नमूद करून पेना यांनी भारतासोबत कृषी, नवीकरणीय ऊर्जा यांसह विविध क्षेत्रात भागीदारी करण्याची इच्छा व्यक्त केली.

पॅराग्वेची लोकसंख्या ६ दशलक्ष आहे परंतू आपला देश १० कोटी लोकांसाठी अन्नधान्य निर्माण करतो. पॅराग्वे १०० टक्के नवीकरणीय ऊर्जा वापरतो तसेच निर्मित ऊर्जेपैकी  ५० टक्के ऊर्जा निर्यात देखील करतो असे त्यांनी सांगितले.

संघटित गुन्हेगारी तसेच ड्रग माफियांमुळे दक्षिण अमेरिका त्रस्त असून ड्रग्ज माफियांचे आव्हान संपविण्यासाठी सर्व देशांनी सहकार्य करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

सन १९५५ मध्ये पॅराग्वेने संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्वसाधारण सभेत महात्मा गांधी यांना श्रद्धांजली वाहिली होती व आपल्या स्वातंत्र्यलढ्यात गांधीजींच्या अहिंसेच्या तत्वज्ञानाचा पुरस्कार केला होता अशी आठवण अध्यक्ष पेना यांनी सांगितली.

पॅराग्वेच्या राष्ट्राध्यक्षांचे स्वागत करताना राज्यपालांनी पॅराग्वेने भारताशी व्यापार वाढविण्यासाठी अधिक प्रयत्न करावे असे सांगितले. पॅराग्वेने आपल्या स्वातंत्र्यलढ्यात महात्मा गांधींची अहिंसेची मूल्ये अवलंबल्याबद्दल राज्यपालांनी संतोष व्यक्त केला.

यावेळी पॅराग्वेचे परराष्ट्रमंत्री रुबेन रामिरेझ लेझकानो, पॅराग्वेचे भारतातील राजदूत फ्लेमिंग रॉल डुआर्टे रामोस, राष्ट्रीय संसद सदस्य नतालिसिओ चेस, खासदार मिगेल डेल पुएर्तो, अमांबाय प्रांताचे गव्हर्नर जुआन अकोस्टा आणि इतर प्रतिनिधी उपस्थित होते.

बैठकीनंतर राज्यपालांनी पॅराग्वेचे राष्ट्राध्यक्ष तसेच त्यांच्या शिष्टमंडळाच्या सन्मानार्थ स्नेहभोजन आयोजित केले.

स्नेहभोजनाला महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, महाराष्ट्र, गोवा व गुजरात प्रभागाचे मुख्य अधिकारी मेजर जनरल बिक्रमदीप सिंह, महाराष्ट्र नौदल प्रभागाचे ध्वज अधिकारी  रिअर ऍडमिरल अनिल जग्गी तसेच इतर निमंत्रित उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!