spot_img
spot_img
spot_img

‘उत्तम जीवनशैली उत्तम आरोग्याची पहिली पायरी!’ – डाॅ. मानसी हराळे

मधुश्री व्याख्यानमाला – प्रथम पुष्प
पिंपरी (दिनांक : ०३ जून २०२५) ‘उत्तम जीवनशैली उत्तम आरोग्याची पहिली पायरी आहे!’ असे प्रतिपादन डाॅ. मानसी हराळे यांनी अरविंद – वृंदा सभागृह, स्वर्गीय दत्तोपंत म्हसकर सार्वजनिक विश्वस्त संस्था, पेठ क्रमांक २७, निगडी प्राधिकरण येथे सोमवार, दिनांक ०२ जून २०२५ रोजी केले. मधुश्री कला आविष्कार आणि दत्तोपंत म्हसकर सार्वजनिक विश्वस्त संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तीन दिवसीय मधुश्री व्याख्यानमालेत ‘आरोग्यम् धनसंपदा’ या विषयावरील प्रथम पुष्प गुंफताना डाॅ. मानसी हराळे बोलत होत्या. पिंपरी – चिंचवड व्याख्यानमाला समिती मुख्य समन्वयक सुहास पोफळे अध्यक्षस्थानी होते; तसेच माजी उपमहापौर शैलजा मोरे, दत्तोपंत म्हसकर सार्वजनिक विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष प्रदीप पवार, मधुश्रीच्या अध्यक्षा माधुरी ओक यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करून व्याख्यानमालेचा प्रारंभ करण्यात आला. माधुरी ओक यांनी प्रास्ताविकातून पंधराव्या वर्षात पदार्पण करणार्‍या मधुश्री व्याख्यानमालेची माहिती दिली. शैलजा मोरे यांनी, सुमारे पंधरा वर्षांपासून मी मधुश्री व्याख्यानमालेची साक्षीदार आहे, अशी भावना व्यक्त केली. सुहास पोफळे यांनी अध्यक्षीय मनोगतातून, ‘समाजाची वैचारिक भूक शमविण्यासाठी व्याख्यानमालांची नितांत आवश्यकता आहे!’ असे मत मांडले.
डॉ. मानसी हराळे पुढे म्हणाल्या की, ‘प्रगत वैद्यकीय शास्त्र, आरोग्य विमा यामुळे सरासरी आयुर्मान वाढले आहे. ऐंशी ते नव्वद वयापर्यंत व्यक्ती सहजपणे जगत आहेत. तरीही शरीराचे सर्व अवयव व्यवस्थित कार्य करीत असतील तरच त्याला उत्तम आरोग्य म्हणता येते. उत्तम आरोग्यासाठी आहार, विहार, व्यायाम, निर्व्यसनीपणा, आरोग्यविषयक जागरुकता या गोष्टींची गरज असते. भारतीयांमध्ये प्रामुख्याने स्थूलतेमुळे अनेक विकारांचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे उंचीनुसार वजन आटोक्यात ठेवले पाहिजे. आहारात आवश्यकतेनुसार पदार्थांचा समावेश करावा. दररोज किमान तीस मिनिटांचा आवडेल अन् झेपेल असा व्यायाम केला पाहिजे. त्यासोबतच पुरेशी विश्रांतीही गरजेची असते. कोणत्याही गोष्टीची अतिरिक्त सवय म्हणजे व्यसन होय. त्यामुळे अतिरेक टाळावा. स्त्री आणि पुरुष यांनी ठरावीक काळानंतर आरोग्य तपासण्या केल्या पाहिजेत. रोज रात्री झोपण्यापूर्वी मनातील द्वेषभाव काढून टाकल्याने शांतपणे झोप लागते. आपल्याला सुदृढ शरीर दिल्याबद्दल देवाप्रति कृतज्ञता बाळगावी; तसेच कोणताही आजार झाला तरी घाबरून न जाता वैद्यकीय तज्ज्ञांना सल्ला आणि औषधोपचार घ्यावेत!’ व्याख्यानानंतर डॉ. हराळे यांनी श्रोत्यांच्या आरोग्यविषयक शंकांचे समाधान केले.
मनीषा मुळे यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. सलीम शिकलगार, राजेंद्र बाबर, मिलिंद कुलकर्णी, राधिका बोर्लीकर, रजनी अहेरराव, अजित देशपांडे, चंद्रकांत शेडगे, शरद काणेकर यांनी संयोजनात सहकार्य केले. राज अहेरराव यांनी सूत्रसंचालन केले. प्राचार्य पी. बी. शिंदे यांनी आभार मानले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!