विश्वबंधुता साहित्य परिषद, रयत शिक्षण संस्थेचे औंध येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय व काषाय प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने विश्वबंधुता दिनाच्या निमित्ताने आयोजित सातव्या बंधुता काव्यमहोत्सवाचे उद्घाटन सोहळ्यात प्रा. सुभाष वारे बोलत होते. नवी पेठेतील एस. एम. जोशी सभागृहात झालेल्या सोहळ्यात काव्यमहोत्सवाचे अध्यक्ष ज्येष्ठ गझलकार सिराज शिकलगार, बंधुताचार्य प्रकाश रोकडे, मंदाकिनी रोकडे, स्वागताध्यक्ष प्रा. भारती जाधव, निमंत्रक प्राचार्य डॉ. अरुण आंधळे, प्रा. चंद्रकांत वानखेडे, कवयित्री संगीता झिंजुरके आदी उपस्थित होते.
यावेळी सिराज शिकलगार लिखित ‘गझल प्रकाश’ गझलसंग्रहाचे, ‘भारत: विश्वबंधुतेचे तीर्थक्षेत्र’ साहित्यकृतीचे प्रकाशन झाले. अरुण पुराणिक (पुणे), प्रभाकर शेळके (जालना), राजू आठवले (अकोला), पालवी पतंगे (मुंबई), तुकाराम कांबळे (नांदेड) सरला कापसे (वर्धा), राजश्री मराठे (हैद्राबाद), राजेश नागूलवार (वर्धा), मनीषा गोरे (सोलापूर), हृदयमानव अशोक (पुणे), प्रतिभा विभुते (पुणे) यांना बंधुता काव्यप्रतिभा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
प्रा. सुभाष वारे म्हणाले, “चळवळीत ‘विचार पेरा कृती उगवेल’ हा सिद्धांत अतिशय महत्त्वाचा आहे. सकारात्मक, शाश्वत काम व्हायचे असेल, तर ध्येयासक्त होऊन सदोदित प्रयत्नशील रहायला हवे. बाबासाहेबांनी बंधुता व समता या दोन मूल्यांची कमतरता असल्याची खंत संविधान सभेत व्यक्त केली होती. मात्र त्यांच्या या विचारांना पुढे घेऊन जात बंधुता परिवार माणसाला माणूस जोडत आहे. समता ही समाजाच्या भल्यासाठी हवी. आज मुस्लिमांना व्हिलन ठरवण्याचे काम होतेय. ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरही खरे गुन्हेगार मोकाट आहेत. समाज घडायचा असेल, तर पुस्तक वाचायला हवीत. मुस्लिम धर्मातही चांगला माणूस घडण्यासाठी काही सुधारणा, प्रबोधन आवश्यक आहे.”
प्रा. भारती जाधव यांनी स्वागत केले. डॉ. अरुण आंधळे यांनी प्रास्ताविक केले. संगीता झिंजुरके यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. चंद्रकांत वानखेडे यांनी आभार मानले.