spot_img
spot_img
spot_img

‘विश्वकरुणा हा आधुनिक साहित्याचा गाभा!’ – भारत सासणे

शबनम न्यूज | प्रतिनिधी
‘विश्वकरुणा हा आधुनिक साहित्याचा गाभा असून ‘चिंबोरेयुद्ध’ या कादंबरीत हा भाव प्रतीत होतो!’ असे मत ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे यांनी रविवार, दिनांक ०१ जून २०२५ रोजी पिंपळे सौदागर येथे व्यक्त केले. प्रा. डॉ. बाळासाहेब लबडे लिखित ‘चिंबोरेयुद्ध’ या कादंबरीला स्मृतिशेष चमेली भाऊराव स्मृती कादंबरी पुरस्काराने सन्मानित करताना सासणे बोलत होते. ज्येष्ठ अनुवादक प्रा. डॉ. विलास साळुंखे, लोकसाहित्याचे अभ्यासक सोपान खुडे, ज्येष्ठ साहित्यिक सुरेश कंक, पीतांबर लोहार, प्रा. डॉ. बाळासाहेब लबडे, स्वाती लबडे, चमेली भाऊराव प्रतिष्ठानचे अध्यक्ष शशिकांत हिंगोणेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
भारत सासणे पुढे म्हणाले की, ‘मराठीतील कादंबरीलेखन हे रंजनात्मक, कलात्मक, वास्तववादी, अतिवास्तववादी अशा टप्प्यातून जात असताना जागतिकीकरणामुळे त्यांत प्रतीकात्मकतेचा अवलंब करण्यात येत आहे. लबडे यांच्या कादंबरीलेखनातील प्रायोगिकता वैश्विक पातळीवरची असल्याने त्याची जागतिक पातळीवर दखल घेतली जाईल!’  प्रा. डॉ. विलास साळुंखे यांनी इंग्रजी ही जागतिक स्तरावरील भाषा असल्याने बाळासाहेब लबडे यांचे सर्व लेखन अनुवादित होण्याची गरज आहे, असे प्रतिपादन केले. सोपान खुडे यांनी, ‘अभिजात भाषा ही अभिजनांपुरती असून लोकसाहित्य अजूनही उपेक्षित आहे!’ अशी खंत व्यक्त केली. पीतांबर लोहार यांनी बाळासाहेब लबडे यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू उलगडून सांगितले.
शशिकांत हिंगोणेकर यांनी प्रास्ताविकातून आईवडिलांच्या स्मृती चिरंतन राहाव्यात म्हणून प्रतिष्ठानच्या माध्यमातून वैशिष्ट्यपूर्ण साहित्यकृतींचा शोध घेऊन त्यांचा मान्यवर साहित्यिकांच्या हस्ते यथोचित गौरव करण्याचा उपक्रम गेल्या वर्षापासून सुरू करण्यात आला आहे, अशी माहिती दिली. पुरस्काराला उत्तर देताना प्रा. डॉ. बाळासाहेब लबडे यांनी कृतज्ञतापूर्वक मनोगत व्यक्त केले. प्रदीप गांधलीकर यांनी सूत्रसंचालन केले. सुरेश कंक यांनी आभार मानले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!