शबनम न्यूज | प्रतिनिधी
तळेगाव-चाकण-शिक्रापूर (रा.मा. ५४८डी) या महत्त्वपूर्ण रस्त्याच्या रुंदीकरण व सुधारणा प्रकल्पाबाबत आता शासनाच्या वतीने अधिकृत आदेश जारी करण्यात आला आहे. हा निर्णय यापूर्वीच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता. मात्र आता या संदर्भातील अधिकृत शासन आदेशामुळे या प्रकल्पाच्या अंमलबजावणीस औपचारिक सुरूवात होणार आहे, अशी माहिती मावळचे आमदार सुनील शेळके यांनी दिली.
या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त करताना आमदार शेळके म्हणाले, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व एकनाथ शिंदे यांनी या प्रकल्पास दिलेले सहकार्य आणि पाठबळ खरोखरच महत्त्वाचे ठरले. तिघांच्या नेतृत्वाखाली राज्य शासनाने हा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतल्याने पुणे जिल्ह्यातील रस्ते विकासाला गती मिळणार आहे.”
या प्रकल्पांतर्गत तळेगाव ते चाकण दरम्यान चार पदरी उन्नत रस्ता व जमिनीवर चार पदरी रस्ता, तर चाकण ते शिक्रापूर दरम्यान जमिनीवर सहा पदरी रस्ता विकसित करण्यात येणार आहे. एकूण सुमारे ५३.२ किमी लांबीच्या या मार्गासाठी शासनाने ३९२३.८९ कोटी रुपयांचा खर्च मंजूर केला आहे.
हा प्रकल्प महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळामार्फत (MSIDC) ३० वर्षांच्या सवलत धोरणांतर्गत (Concession Model) राबवण्यात येणार आहे. प्रकल्पासाठी लागणाऱ्या जमिनीचे संपादन, पथकर वसुली आणि देखभाल व्यवस्थापनाची जबाबदारी देखील MSIDC कडेच असणार आहे.
“या मार्गामुळे मुंबई-पुणे महामार्ग आणि पुणे-संभाजीनगर महामार्ग यांच्यातील महत्त्वपूर्ण दळणवळण सुकर होणार आहे. औद्योगिक दृष्टिकोनातून पाहता, चाकण-तळेगाव पट्ट्याला अधिक गती मिळेल. हा निर्णय म्हणजे संपूर्ण परिसराच्या विकासाची ग्वाहीच आहे,” असे आमदार शेळके यांनी स्पष्ट केले.
ते पुढे म्हणाले, “हा निर्णय होण्यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून मी सातत्याने पाठपुरावा करत होतो. शासनाच्या पातळीवरून मंजुरी मिळाल्यानंतर आता अधिकृत शासन आदेश देखील निघाल्याने या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीकडे वाटचाल सुरू झाली आहे. हा प्रकल्प वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण व्हावा यासाठी मी स्वतः लक्ष ठेवून आहे.”
हा रस्ता परिसरातील नागरी आणि औद्योगिक विकासाला चालना देणारा ठरणार असल्याने नागरिकांत समाधानाचे वातावरण आहे.