- राजेंद्र हगवणे आणि शशांक हगवणे दोघांची पक्षातून हकालपट्टी
शबनम न्यूज | पुणे
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (अजित पवार) नेते राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवीने १६ मे रोजी आत्महत्या केली आहे. तिचा हुंड्यासाठी सासरकडच्या मंडळींकडून छळ केला जात होता असा आरोप वैष्णवीच्या पालकांनी केला आहे. तसेच वैष्णवीच्या सासरकडच्या मंडळींवर कौटुंबिक हिंसाचाराचेही आरोप केले आहेत. दरम्यान, या प्रकरणामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमुख व उपमुख्यमंत्री अजित पवारांवरही टीका होत आहे. यावर आज पहिल्यांदाच अजित पवारांनी भाष्य केलं. तसेच त्यांनी राजेंद्र हगवणेंवरील संताप व्यक्त केला.
अजित पवार म्हणाले, “मी आज या मंचावरून जाहीर करून टाकतो की तो (राजेंद्र हगवणे) माझा पदाधिकारी नाही. परंतु, तो माझ्या पक्षाचा सभासद असेल तर मी आजपासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतून त्याची हकालपट्टी केली असं समजा. कारण अशी नालायक माणसं मला माझ्या पक्षात नको. अशा लोकांची आपल्या पक्षाला काय गरज आहे? मी गरिबांच्या दारात दहा वेळा जाईन. पण, असल्या ** दारात जाणार नाही. परंतु, कुठेतरी माझी बदनामी थांबली पाहिजे. मी अजून प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधिंशी यावर बोललेलो नाही. परवा पुण्याला जाईन तेव्हा त्यांच्याशी बोलेन”.
दरम्यान, राष्ट्रवादी पक्षाचे नेते राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मुलगा शशांक हगवणे या दोघांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतून हकालपट्टी करण्यात आली आहे. तसं पत्रक पक्षाकडून काढण्यात आलं आहे. वैष्णवी शशांक हगवणे हिच्या आत्महत्या प्रकरणात राष्ट्रवादीचं नाव जोडलं जात होतं. त्यामुळे अखेर राजेंद्र हगवणे व शशांक हगवणे यांची उचलबांगडी करण्यात आली आहे.