spot_img
spot_img
spot_img

‘निढळ: ग्रामविकासाचा दळवी पॅटर्न’ पुस्तकाचे नाना पाटेकर यांच्या हस्ते रविवारी (ता. २५) प्रकाशन

शबनम न्यूज | पुणे
सातारा जिल्ह्यातील निढळ (ता. खटाव) या एकेकाळी दुष्काळी व अविकसित असलेल्या गावचे भूमिपूत्र व आयएएस अधिकारी, रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थ, नोकरवर्ग व व्यावसायिकांच्या सहभागातून गेल्या ४१ वर्षांत परिपूर्ण व स्मार्ट व्हिलेज म्हणून नावारुपाला आले आहे. लेखक सुनील चव्हाण यांनी ‘निढळ’ची हीच प्रगतशील वाटचाल ‘निढळ: ग्रामविकासाचा दळवी पॅटर्न’ या पुस्तकाच्या रुपाने पुढे आणली आहे. देशातील सर्व गावांच्या विकासाला उपयुक्त ठरणाऱ्या या पुस्तकाचे प्रकाशन येत्या रविवारी (ता. २५) सकाळी ११.१५ वाजता बालगंधर्व रंगमंदिर, जंगली महाराज रस्ता, पुणे येथे ज्येष्ठ अभिनेते व नाम फाउंडेशनचे अध्यक्ष नाना पाटेकर यांच्या हस्ते होणार आहे. नाना पाटेकर यांनीच या पुस्तकाला प्रस्तावना लिहिली आहे.
चंद्रकांत दळवी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमाला पुणे महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील असतील. पीआरएम सॉफ्ट सोल्युशन्सचे कार्यकारी संचालक राजेंद्र शिंदे, महाराष्ट्र आर्थिक विकास महामंडळाचे उपाध्यक्ष सचिन ईटकर यांची विशेष उपस्थिती राहील. यावेळी एस. बी. प्रॉडक्शन्सने तयार केलेल्या व शंकर बारवे दिग्दर्शित ‘निढळ गाव: परिवर्तनाचा प्रवास’ या माहितीपटाच्या टीझरचे अनावरण होणार आहे.
शिक्षण, पाणलोट विकास, कृषी, ग्रामस्वच्छता, वनविकास, संस्थात्मक आर्थिक विकास, उद्योजकता, पायाभूत सुविधा आदी क्षेत्रात ‘निढळ’ गावाने समृद्ध वाटचाल केली आहे. देशातील सर्वच गावांना ही वाटचाल पथदर्शी ठरावी, या उद्देशाने हे पुस्तक महत्वपूर्ण आहे. सत्व फाउंडेशनच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन केले असून, धर्मेंद्र पवार, अभिषेक दळवी, शंकर बारवे, तबाजी कापसे आदी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेत आहेत, अशी माहिती फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव कुलगोड यांनी दिली.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!