पुणे शहरात पावसाळ्यापूर्वी करावयाची कामे पार दर्शकपणे त्वरित करावी अशी मागणी माजी आमदार तथा शिवसेनेचे महानगर प्रमुख रवींद्र धंगेकर यांनी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त यांच्याकडे केली आहे.
रवींद्र धंगेकर यांनी दिलेले निवेदनात नमूद केले आहे की पुणे शहरात मंगळवारी तासभर झालेल्या अवकाळी पावसामुळे जवळपास सर्वच प्रमुख रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले, अनेक भागात नाले चेंबर तुंबलेले असल्याने रस्त्यावर पाणी मोठ्या प्रमाणात वाढत गेल्याने अनेक भागात रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले, परिणामी पुणेकरांना नाहक त्रास सहन करावा लागला ,शिवाय भर पावसात वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात झाली. मे महिन्यात केवळ तासभर झालेल्या पावसामुळे ही परिस्थिती झाली, पावसाळा अजून सुरूही झाला नाही त्याआधीच पुणेकरांना रस्त्यावर साचलेल्या तसेच घरात घुसलेल्या पाण्यात अडकून राहावे लागते आहे. त्यामुळे नागरिकांमधून मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त होत आहे.
महापालिकेतर्फे पावसाळ्यापूर्वी करावयाची कामे होणे आतापर्यंत अपेक्षित होते परंतु ते काम झाल्याचे पहावयास मिळत नाही. पुणे महानगरपालिकेने 90% पावसाळी कामे केल्याचा दावा नुकताच केला जर ही कामे पारदर्शकपणे झाली असती तर तासाभराच्या पावसामुळे नागरिकांचे हाल झाले नसते तरी पुणे शहरात पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नाले सफाई कामे हातात घ्यावी. यावर देखरेख करण्यासाठी पथक नेमावे. दररोजच्या साफसफाईची छायाचित्रे व्हिडिओ चित्रीकरण करावे. तसेच प्रत्येक कामाचा अहवाल सादर करण्यास आदेश द्यावी. पुढच्या काही दिवसात पारदर्शक मोहीम राबविली जावी. असे झाले तर पावसाळ्यात रस्त्यावर पाणी साचण्याचे प्रमाण कमी होऊन मोठ्या प्रमाणात दिलासा मिळू शकतो याबाबत तातडीने पावले उचलावी नाहीतर शिवसेना स्टाईलने महापालिकेच्या प्रांगणात मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येईल असा इशारा माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी पुणे महानगरपालिका प्रशासनाला दिला आहे.