शबनम न्यूज | पिंपरी
पिंपरी चिंचवड औद्योगिक परिसरात औद्योगिक किंवा MIDC च्या जागा शिल्लक नसल्याने याच औद्योगिक परिसरातील उद्योजक हे चाकण औद्योगिक परिसर जवळ असल्याने याच औद्योगिक परिसरात उद्योगाचे नवीन जागेत विस्तारीकरण करत आहेत. तसेच नवीन आंतरराष्ट्रीय कंपन्याच्या संख्येत वाढ होत आहे. या परिसरात उद्योगांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने त्याचा परिणाम हा महावितरणवर वीज पुरवठा करण्याकरिता अधिक भार पडत आहे. त्यांच्याकडून सुरळीत वीज पुरवठा केला जाऊ शकत नाही. कारण या चालू मे महिन्यात चाकण औद्योगिक परिसरात वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण खूपच वाढलेले आहे. दि 19 व 20 मे 2025 या दोन दिवसांत महावितरण कडून पूर्णवेळ म्हणजे 48 तास वीज पुरवठा उपलब्ध होऊ शकला नाही. मागील आठवड्यात महावितरणचे अभियंते व संबंधित अधिकारी आणि उद्योजक यांची मीटिंग होऊन सुद्धा वीज पुरवठ्यावर त्याचा काहीच चांगला परिणाम झाला नाही. या चाकण औद्योगिक परिसरात वारंवार वीज पुरवठा खंडित होण्यामुळे यांचा परिणाम हा उद्योगांवर मोठ्या प्रमाणावर होऊन या परिसरातील उद्योजकांचे करोडो रुपयांचे आर्थिक नुकसान झालेले आहे. या नुकसानीला जबाबदार कोण? हा प्रश्न उद्योजकाना पडला आहे महावितरण हे नुकसान भरपाई देणार का?
तरी या औद्योगिक परिसरात महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्यानी योग्य ते नियोजन करून त्यांच्याकडून केला जाणारा वीजपुरवठा अखंडित ठेवण्यासाठी योग्य ते प्रयत्न करावेत व उद्योजकाचे होणारे नुकसान कमी करण्यास सहकार्य करावे अशी उद्योजकांची मागणी आहे.
सदर माहिती ही पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेचे संचालक भारत नरवडे यांनी दिली.